Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Satara › ...तर सर्वांचे प्राण वाचले असते

...तर सर्वांचे प्राण वाचले असते

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी 

या कर्मचार्‍यांची बस घाटातील एका ठिकाणावर आल्यानंतर गाडीचा डावा टायर निसरड्या मातीमुळे जाग्यावर फिरून मातीत रूतला व गाडी थेट दरीत कोसळली. या ठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने जास्त खोलवर बस गेल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. जर या ठिकाणी संरक्षक कठडे असते तर कदाचित मृतांची संख्या कमी असती किंबहुना हा अपघातच झाला नसता, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. 

महाबळेश्‍वर हे हिलस्टेशन विकसित केल्यानंतर कोकण व मुंबईतील नागरिकांना विश्रांतीसाठी येण्यासाठी अंबेनळी घाटाची बांधणी करण्यात आली होती.  सध्याच्या घडीला हा मार्ग खाचखळग्यांनी भरला आहे. तर सरंक्षक कठडे तुटले आहे. तब्बल 40 किलोमीटरचा हा घाट सेक्शन पार करताना नागरिकांच्या मनात नेहमीच धाकधूक असते. ज्या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. हे ठिकाण अपरिचित आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होतात, असे नाही.

मात्र, पावसाचे प्रमाण व दुर्दैव यामुळेच हा अपघात झाला असे म्हणावे लागेल. परंतु, रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे असते तर ही बस खोल दरीत कोसळली नसती. त्यामुळे मृतांचा आकडा कमी झाला असता. किंबहुना किरकोळ अपघात होऊन कोणालाही जीव गमवावा लागला नसता. या अपघातामुळे या घाटातील रस्त्याच्या दुरूस्तीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. यासाठी संबंधित आमदारांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. जर रायगड प्रशासनाने त्याच वेळी खबरदारी घेतली असती तर हा अपघात घडलाच नसता. ही घटना म्हणजे सातार्‍याची धोक्याची घंटा असून सातारा हद्दीतील 20 किलोमीटरचा मार्ग युध्दपातळीवर दुरूस्त व्हावा, अशी मागणी होत आहे.