Thu, Jul 18, 2019 04:34होमपेज › Satara › दरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरतच...

दरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी कसरतच...

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:59PMसातारा: प्रतिनिधी

आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाल्यानंतर तात्काळ यंत्रणा सज्ज झाल्या. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबवून मदत कार्याला सुरूवात केली. सायंकाळपर्यंत 33 पैकी 13 मृतदेह हाती लागले होते. उर्वरित मृतदेह काढण्यासाठी ट्रेकर्सच्या 5 पथकांना अख्खी रात्र जागावी लागणार आहे. 

अंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून 33 जण ठार झाले असल्याची माहिती रत्नागिरी, रायगड व सातारा जिल्ह्यात पसरल्यानंतर एकच हलकल्‍लोळ माजला. घटनास्थळी आमदार, पोलिस व ट्रेकर्स दाखल झाल्यानंतर तत्काळ बचावकार्याला सुरूवात झाली. सकाळी 10.30 वाजता अपघात झाला होता. यानंतर माहिती मिळण्यापासून ते यंत्रणा सज्ज होण्यासाठी काहीच वेळ लागला. मात्र, 600 फूट खोल गेलेल्या बसमधून 33 मृतदेह काढणे ही सोपी गोष्ट नव्हती. दरी खोल असल्याने आणि त्या ठिकाणची जागा निसरडी असल्याने ज्या लोकांनी याचे प्रशिक्षण घेतले आहे त्यांनाच दरीत पाठवण्यात येत होते. मृतदेह बाहेर काढल्यानंतर रूग्णवाहिकेतून ते पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात येत होते. 

साधारण: दुपारी 12 वाजता हे मदत कार्य सुरू झाले. यानंतर सायंकाळी 5 पर्यंत 12 ते 13 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. उर्वरित मृतदेह बाहेर काढण्यासाठी अख्खी रात्र लागणार असल्याने पोलादपूर प्रशासनाने ट्रेकर्ससाठी जनरेटरसह इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या. या मदत कार्यात सातार्‍यातील महाबळेश्‍वर व सह्याद्री टेकर्सचा समावेश होता. तर कोकणातील 3 ट्रेकर्सची पथके कार्यरत होती. मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुमारे 200 ते 250 जण कार्यरत होते. 600 फूट खोल दरीतून आपला जीव सांभाळत मृतदेह बाहेर काढणे हे फार मोठे जिकीरीचे काम आहेत. परंंतु, हे काम ट्रेकर्सनी चांगल्या पध्दतीने पार पाडले.