Fri, Mar 22, 2019 00:17
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › तापोळ्याचा टेंट हाऊस पाहत होता वाट

तापोळ्याचा टेंट हाऊस पाहत होता वाट

Published On: Jul 29 2018 1:25AM | Last Updated: Jul 28 2018 10:56PMसातारा: प्रतिनिधी

दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून चार-दोन क्षण निवांत मिळावे यासाठी विद्यापीठामार्फत शनिवार आणि रविवार जोडून सुट्टी आल्याने पिकनिकचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शनिवारच्या रात्री तापोळा येथील टेंट हाऊस बुक करण्यात आला होता. मात्र, घाटातच अघटित घडल्याने टेंटहाऊस त्यांची वाटच पाहत राहिला.

12 वीचा निकाल लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होते. दापोलीचे कृषी विद्यापीठ हे राज्यात प्रसिध्द आहे. त्या ठिकाणी शेतीविषयी सर्व अभ्यासक्रम शिकवले जातात. सोमवारपासून या ठिकाणी वर्ग सुरू होणार आहेत. त्यानंतर कर्मचारी वर्गाला वर्षभर कामात गुंतून रहावे लागणार आहे. त्यामुळेच सहलीचे नियोजन करण्यात आले होते. 

सध्या पावसाळा सुरू असल्याने हिलस्टेशन असणार्‍या महाबळेश्‍वर येथील पॉईंट पहायचे मज्जा करायची अन् तापोळा टेंट हाऊस येथे मुक्‍काम करायचा प्लॅन ठरला होता. त्यानुसार अगोदरच तापोळ्यातील ते टेंटहाऊस बुक करण्यात आले होते. शनिवारचा मुक्‍काम करून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विद्यापीठातील गहू संशोधन केंद्रास भेट देऊन पुन्हा दापोली असे नियोजन ठरले होते. 

सकाळी 6.30 वाजता सर्व कर्मचार्‍यांनी ग्रुप फोटो काढून सहलीच्या प्रवासाला सुरूवात केली. परंतु, हा फोटो त्यांचा शेवटचा फोटो असेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. त्यानंतरचे पुढील 4 तास त्यांनी बसमध्ये गंमत जंमत करत घालवले. मात्र, त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यामुळे महाबळेश्‍वर आणि तो टेंट हाऊस त्यांची वाटच पाहत बसले. या सर्व कर्मचार्‍यांचे मृतदेहच परत गेल्याने टेंटहाऊसही सुनासुनाच होता.