Thu, Mar 21, 2019 23:22
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › विद्यार्थ्याच्या बसला अपघात

विद्यार्थ्याच्या बसला अपघात

Published On: Nov 30 2017 11:55PM | Last Updated: Nov 30 2017 11:54PM

बुकमार्क करा

खंडाळा : वार्ताहर 

सातारा-पुणे महामार्गावर खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यानंतर सहलीच्या लक्झरी बसला पाठीमागून भरधाव येणार्‍या दुधाच्या टँकरने जोरदार धडक दिल्याने बस पुढील ट्रकवर आदळली. हा ट्रक दुसर्‍या ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात नागपूरहून सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी व बस आणि ट्रकचालक जखमी झाले. एक विद्यार्थी गंभीर जखमी असून त्याला उपचारार्थ पुणे येथे हलवले. 

नागपूर येथील प्रज्ञा ट्युशन या खासगी क्लासचे 47 विद्यार्थी, 1 शिक्षिका, 3 स्वयंपाकी महिला, 3 बस कर्मचारी असे 54 जण सहलीसाठी महाबळेश्‍वर येथे  धनेश्‍वरी ट्रॅव्हल्सच्या बसने आले होते. पाचगणी व महाबळेश्‍वर पाहिल्यानंतर सर्व जणांनी वाई येथे रात्रीचे जेवण केले. त्यानंतर ते औरंगाबाद येथे जाण्यासाठी निघाले होते. जेवणानंतर सर्व जण बसमध्ये झोपले होते.  खांबाटकी बोगदा ओलांडून पुणे बाजूकडे जाताना उतारावर काही वाहने थांबली होती.

समोर वाहने थांबल्याने लक्झरी बसचालकाने बस थांबवली. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दूध टँकरला ब्रेक न लागल्याने बसच्या पाठीमागील बाजूवर तो आदळून डाव्या बाजूच्या कठड्यास धडकला. टँकरच्या जोरदार धडकेने बस पुढे उभ्या असलेल्या कोंबड्या भरलेल्या ट्रकवर आदळली. त्यामुळे ट्रक दुसर्‍या ट्रकला धडकला. बसला पाठीमागून धडक बसल्याने झोपेतच विद्यार्थी समोरील बाकांना धडकल्याने त्यांना डोके, नाक, पायाला मार बसला. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस घटनास्थळी हजर झाले.  

अपघातातील जखमी 

जखमींमध्ये भाविक अशोक बांते (वय 15), कार्तिक किशोर ठाकरे (15), आनिक्षा विजय घायवाट (20), संगीता गजानन पारतवार (60), कमलाबाई तोलाराम सुतोणी (65), अग्‍नी अनिल राऊत (20), देवेंद्र रमेश चौधरी (21), मयुरी काशीनाथ लोनगाडगे (20), प्रणय अरुण शिवणकर (15), हर्षल लीलाधर बांते (15),  रागिणी विनोद देवडे (20) बसचालक बाळकृष्ण रामनरेश विश्‍वकर्मा (49, सर्व रा. नागपूर), सतीश सुभाष शेटे (32, रा. नवे पारगाव, हातकणंगले, जि. कोल्हापूर), ट्रकचालक चुन्‍नाराम सलामी (28  रा. मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे.