Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Satara › एटीएम मशिन पळवणारी टोळी जेरबंद 

एटीएम मशिन पळवणारी टोळी जेरबंद 

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 11:51PMकराड : प्रतिनिधी 

एटीएम मशिन पळवणारी टोळी कराड शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. गतवर्षी मलकापूर (ता. कराड) येथील राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेचे एटीएम मशिन उचकटून पळवून नेल्याची घटना घडली होती. यातील चार संशयितांना कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.  
सुमारे वर्षभरापूर्वी मलकापूर येथील महामार्गालगत असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेचे एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मशिन उचकटून नोटांसह ते गायब केले होते.

चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी एटीएम मशिन पळवल्याचा प्रकार दुसर्‍या दिवशी सकाळी उघडकीस आला होता. याप्रकरणी बँकेच्या अधिकार्‍यांनी कराड शहर पोलिसांत फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास कराड पोलिसांकडून  सुरू होता.  दरम्यान, तपास सुरू असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकार्‍यांनी राज्यात इतर ठिकाणी अशा प्रकारे घडलेल्या गुन्ह्यांची माहिती घेऊन त्या अनुषंगाने चौकशी केली असता पुणे पोलिसांनी एक टोळी पकडल्याचे समजले. त्यानुसार पुण्याला जाऊन  पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांच्या टोळीकडे चौकशी केल्यावर मलकापूर येथील चोरी प्रकरणात या टोळीचा हात असल्याचे समोर आले. त्यानुसार कराड शहर पोलिसांनी पुणे पोलिसांच्या ताब्यातील टोळीला कारागृहातून ताब्यात घेतले आहे.