होमपेज › Satara › ‘एटीएम फ्रॉड’चे पैसे देण्यात ‘सातारा पोलिस स्मार्ट’ 

‘एटीएम फ्रॉड’चे पैसे देण्यात ‘सातारा पोलिस स्मार्ट’ 

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 05 2018 11:05PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

बदलत्या जमान्याबरोबर चोरटेही अ‍ॅडव्हान्स झाले असून ऑनलाईन फसवणूक, एटीएम फ्रॉडद्वारे फसगत होण्याचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. असे असले तरी  गेल्या सहा महिन्यात मात्र ‘सातारचे पोलिस स्मार्ट’ बनले असून चोरीस गेलेल्या रकमेपैकी 80 ते 90 टक्के रक्‍कम मिळवून देण्याचे कर्तव्य त्यांनी बजावले आहे. मुळातच मोबाईलवरील पैशाच्या आमिषाला बळी पडू नका. त्यातुनही  चुकून आपल्या कुटुंबिय, मित्रांपैकी कोणाचा ओटीपी नंबर मागून फसवणूक झाली असेल तर नजीकच्या पोलिस ठाण्याशी त्वरित संपर्क साधल्यास आता तुमची सर्व रक्‍कम मिळण्यास मदत होणार आहेे.

सध्या बँकिंग युग अवतरले आहे.  प्रत्येकाची बँकांमध्ये एक किंवा दोनहून अधिक खाती आहेत. महिन्याला राबराब राबून त्याचा मोबदला पैशाच्या स्वरुपात बँकेत जमा होतो. सर्वसामान्यांच्या बँकेतील या पैशांवर मात्र बँक फ्रॉड करणार्‍या चोरट्यांची नजर कायम लागलेली आहे. यासाठी चोरट्यांना बँकेतील खातेदारांच्या मोबाईल नंबरसह विविध माहिती मिळाल्यानंतर ते फ्रॉड करण्यासाठी नामी शक्‍कल वापरतात. ‘मी बँकेतून अधिकारी बोलत आहे. तुमच्या खात्यामध्ये, एटीएममध्ये अडचण आली आहे, त्याची व्हॅलिडीटी संपत आली आहे, असे सांगितले जाते. त्यासाठी तुम्हाला एक ओटीपी नंबर मोबाईलवर पाठवतो. तो क्रमांक सांगा, मग काही अडचण राहणार नाही.’ अशा आशयाचा संवाद  केला जातो. भारतातील प्रत्येक बँक खातेदार हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत साक्षर किंवा समज असलेला नाही. याचाच दुरुपयोग करणारी टोळी कार्यरत असून आपण सुरक्षित समजणार्‍या बँकेतील पैशांवर आपल्याच काही चुकांमुळे डल्‍ला मारला जात आहेे.

मोबाईलद्वारे तुम्हाला कोणीही ओटीपी क्रमांक मागितला तर तो मुळातच कोणालाच देवू नका. याच ओटीपी क्रमांकांच्या आधारे बँकेतील आपली सुरक्षित रक्‍कम आपण अनोळखीच्या हातात देतो. त्याद्वारेच चोरटे तुमची रक्‍कम ऑनलाईन ट्रान्सफर करुन त्यावर ऑनलाईन पध्दतीने खरेदी करतात व आपले हक्‍काचे पैसे त्रयस्थ माणूस उडवून टाकतो.

गेल्या चार ते पाच वर्षापासून या पद्धतीचा गंडा घातला जात आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. आता मात्र सातारा पोलिस दल अशी फ्रॉड झालेली रक्‍कम शोधून ती पुन्हा संबंधितांना देण्यासाठी सक्षम झाले आहे. यासाठी जिल्हास्तरासाठी ‘सायबर पोलिस ठाण्याची’ निर्मिती झाली असून या माध्यमातून आता फसवणूक झालेल्या रकमेतील सर्वच्या सर्व रक्‍कम किंवा कमीत कमी 80 टक्क्यांपर्यंतची रक्‍कम मिळवली जात आहे. यासाठी ज्या व्यक्‍तीचे पैसे गेले आहेत त्यांनी घटनेनंतर किमान चार तासाच्या किंवा त्याहूनही कमीत कमी वेळेत नजीकच्या पोलिस ठाण्याशी किंवा पोलिस मुख्यालयाच्या पाठीमागील सायबर पोलिस ठाण्याशी काही कागदपत्रांसह माहिती देणे गरजेचे आहे.

सातारा सायबर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात एटीएम फ्रॉड झालेल्या 30 तक्रारदारांचे पैसे परत देण्यात यश आले आहे. चोरीला गेलेली रक्‍कम 7 लाख 84 हजार रुपये असून त्यातील 2 लाख 75 हजार रुपये परत मिळवण्यात यश आले आहे. टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण 36 टक्के एवढे आहे. गेल्या सहा महिन्यात मात्र सायबर पोलिसांच्या आकडेवारीत कमालीचा फरक पडलेला आहे. एटीएम फ्रॉडद्वारे चोरी झालेल्या रकमेपैकी 80 टक्क्यांपर्यंतची रक्‍कम परत मिळवून देण्यात आली आहेे. यामुळे टक्केवारीच्या तुलनेत हे प्रमाण लक्षणीय वाढले असून ते 65 टक्के एवढे राहिले आहे. अर्थात तक्रारदार बँक स्टेटमेंट, मोबाईलवर आलेला मेसेज व एटीएम कार्ड कमी वेळेत पोलिस ठाण्यापर्यंत आल्याने ते शक्य झाले आहे.