Wed, May 22, 2019 06:16होमपेज › Satara › अंनिसची सातार्‍यात ‘जवाब दो’ निषेध रॅली

अंनिसची सातार्‍यात ‘जवाब दो’ निषेध रॅली

Published On: Aug 21 2018 1:40AM | Last Updated: Aug 20 2018 10:51PMसातारा : प्रतिनिधी

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण झाली. पाच वर्षांनंतर मारेकरी सापडले. आता सूत्रधार शोधावा यासह काँग्रेड गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणाचा छडाही तातडीने  लावावा, या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तनवादी समन्वयक समिती पदाधिकारी, विद्यार्थी यांनी विवेकाचा आवाज बुलंद करत सातार्‍यात  ‘जवाब दो’ निषेध रॅली काढली. 

येथील शाहू चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पोवई नाकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘जवाब दो निषेध रॅली’ काढण्यात आली. रॅलीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. ‘अमर रहे, अमर रहे डॉ दाभोलकर अमर रहे’, ‘हम सब एक हे’, ‘फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर’, ‘जितेंगे लढेंगे, लढेंगे जितेंगे’, ‘बघताय काय सामील व्हा’, ‘मारेकरी सापडले सूत्रधार शोधा’, ‘जवाब दो महाराष्ट्र शासन जवाब दो’, ‘माणूस मारता येतो विचार मारता नाही येत’ या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दुमदुमून गेला. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर रॅली आल्यानंतर ‘डॉ. दाभोलकर जोमाने नेऊ पुढे चळवळ’ हे अभिवादन गीत सादर करण्यात आले. यानंतर जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की,  डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला पाच वर्षे तर कॉ पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे झाली. यानंतर कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. याप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात हिंदुत्ववादी संघटनेच्या साधकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, तपासातील दिरंगाईमुळे ठोस पुरावे आणि गुन्हेगारांना अटक करण्यात अपयश आले. यामुळे संविधानाच्या अधिष्ठानाला धक्का पोहचवून संवैधानिक व्यवस्था मोडकळीस आणली जात असल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे. 

यावेळी अंनिसचे राज्यप्रधान सचिव प्रशांत पोतदार, डॉ. चित्रा दाभोलकर, डॉ. प्रसन्न दाभोलकर, वंदना माने, भगवान रणदिवे, डॉ दीपक माने, उदय चव्हाण, चंद्रकांत नलवडे, सीताराम चाळके, विजय पवार, राजेंद्र पवार, गौतम वाळींजे यासह तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.