Tue, Apr 23, 2019 18:21होमपेज › Satara › एडीटीपीचे दुर्लक्ष : सातारा तहसीलदार कारवाई करणार का?

एडीटीपीचे दुर्लक्ष : सातारा तहसीलदार कारवाई करणार का?

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 8:06PMसातारा : आदेश खताळ

राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल, ढाबे, शोरुम, कंपन्यांची बेकायदा बांधकामे सुरु असून त्याकडे सहायक संचालक नगररचना विभागाचे दुर्लक्ष होत आहे. अत्यंत धोकादायक बनलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये बड्या धेंडांची नावे असून त्यांच्यावर सातारा तहसीलदार कारवाई करणार का? असा सवाल केला जात आहे.

जिल्ह्याच्या मध्यमातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. जाहिरातींचे फ्लेक्स तसेच मोठमोठी होर्डिंग्जही धोकायदायक बनली आहे. शेकडो होडिंग्ज तसेच फ्लेक्स महामार्ग तसेच सेवा रस्त्यांवर पहायला मिळत आहेत. सेवा रस्त्यांवर असणार्‍या चौकात अशा फ्लेक्सचे जणू पिकच आले आहे. हे फ्लेक्स काढण्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई करण्यात प्राधिकरणाकडून प्रचंड उदासीनता असल्याचे दिसून येत आहे.

मोठमोठी होर्डिंग्ज तसेच फ्लेक्सवर कारवाई होत नसल्यामुळे बड्या धेंडांकडून बेकायदा बांधकामे केली जावू लागली आहेत. राष्ट्रीय महामार्गापासून कंट्रोल लाईनपर्यंत कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यासाठी नगरचचना विभागाने अटी शर्ती घालून दिल्या आहेत. मात्र, त्याकडे डोळेझाक करुन कुणालाही न जुमानता रेटून बेकायदा बांधकामे केली जात आहेत.

व्यापारी क्षेत्रासाठी करण्यात येणार्‍या बांधकामासाठी बिल्डिंग कंट्रोल लाईन राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यापासून  75 मीटर तर रहिवास क्षेत्रासाठी 40 मीटर असणे गरजेचे आहे. मात्र, नगररचना विभागाचे नियम धाब्यावर बसवून बड्या धेंडांकडून  रेटून बांधकाम करत बिल्डिंग कंट्रोल लाईनचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत टीपीच्या संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रारी करुनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

गोडोलीतील झालेल्या बेकायदा बांधकामांची तक्रार झाली आहे. सर्व्हे नं. 19 अ/20 अ प्लॉट नं. 89 चे  क्षेत्र 1218. 00 चौ. मी. असून त्याठिकाणी आनंद यशवंत बर्गे यांचे नाव आहे. त्या प्लॉटमध्ये अनाधिकृत बांधकाम व पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. संंबंधित शेड व राष्ट्रीय महामार्गालगतच सर्व्हिस रस्ता यातील अंतर सुमारे 10 मीटर आहे. हे बांधकाम व पत्र्याचे शेड शासकीय नियमानुसार नसल्याने बेकायदेशीर असल्याची तक्रार आहे. या बांधकामास कोणतीही परवानगी नसून त्या शेडमध्ये बजाज कंपनीच्या दुचाकी व स्कूटर वाहनांची विक्री व्यवसाय केला जात आहे. अशा बेकायदा बांधकामांमुळे महामार्गावर गर्दी होवून भविष्यात मोठी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महामार्गावर विविध शोरुमची कार्यालये आहेत. यांच्याबाबतही तक्रारी येत आहेत. या शोरुमशिवाय महामार्गालगत बरीच हॉटेल्स तसेच ढाबेही बेकायदेशीर बांधकामे असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे.

सहायक संचालक नगररचना विभाग यांच्याकडे बेकायदा बांधकामांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या आहेत. मात्र, संबंधित अधिकार्‍यांकडून त्यावर कारवाई का होत नाही? त्यामागे अधिकार्‍यांचे काय गौडबंगाल आहे? असे सवाल केले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या बेकायदा बांधकामांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.  त्यामुळे संबंधित बेकायदा बांधकामे पाडणे गरजेचे बनले आहे. मात्र, एडीटीपीकडून दखल घेतली जात नसल्याने सातारा तहसीलदारांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.