Thu, Jan 24, 2019 04:08होमपेज › Satara › महिलेला जाळण्याइतपत मजल 

महिलेला जाळण्याइतपत मजल 

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 05 2018 10:44PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

आडूळ येथील 65 वर्षीय महिलेला एका खाजगी कंपनीच्या कर्मचार्‍याने जाळून मारल्याची घटना घडली. आजवर याच कंपन्यांच्या अनागोंदी कारभारामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामात अप्रत्यक्ष काहींचे  बळी गेले त्यावेळी त्यांना कोणीच जाब विचारला नाही. आता तर  महिलेला पेटविण्यापर्यंत मजल गेली असताना स्थानिक नेते व प्रशासन ढिम्म आहे. त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 

आडूळपेठ (ता. पाटण) येथील 65 वर्षीय अमरावती सखाराम चव्हाण यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्यात आल्याची भयंकर घटना घडली. वास्तविक त्यांच्या घराजवळची जागा ही कराड चिपळूण राज्यमार्गाचा राष्ट्रीय महामार्ग बनविण्यासाठी काम करीत असणार्‍या एलअ‍ॅण्डटी कंपनी व तीच्या खासगी ठेकेदारांना त्यांचे साहित्य ठेवण्यासाठी भाड्याने देण्यात आली आहे. मात्र तेथे यांची मुजोरी चालू होती. त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी अमरावती चव्हाण पुढे आल्या होत्या. त्यांचा आवाज मुजोर कर्मचार्‍याने कायमचा बंद करून टाकला. 

संबंधित महिलेने मृत्यूपूर्व जबाबात हा धक्कादायक प्रकार कथन केला आहे.शिवाय संशयितांना ओळखलेही आहे. सुरूवातीला कारवाईत आखडते हात घेणार्‍या पोलिस यंत्रणेने दलित संघटना व वरिष्ठांच्या आदेशानंतर संशयित  विकास भैरवशंकर पांडे (वय 23) रा. उत्तर प्रदेश याला अटक केली. त्याच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. 

मुजोर कंपन्यांना वेळीच  पायबंद घातला असता तर परप्रांतियांची येवढी मुजोरी वाढली नसती. प्रशासकीय यंत्रणेने याकडे दुर्लक्ष केले. तर राजकीय नेत्यांनी या रस्त्यांची कामे आपल्या बगलबच्यांना मिळण्यासाठी  कंपन्या व परप्रांतियांची पाठराखण केल्याचे लोक उघडपणे बोलत आहेत. या सर्वच बाबींची वरिष्ठ पातळीवरून सखोल व निःपक्ष चौकशी करून त्यांची पाठराखण करणारांचीही नावे समोर आली पाहिजेत, असा संतप्त सूर जनतेमधून उमटत आहे. 

खा. सुप्रिया सुळे यांचे ट्विट मात्र स्थानिक नेते गप्प?

एरवी किरकोळ कारणावरून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे तालुक्यातील स्थानिक नेते व लोकप्रतिनिधी एका वृद्ध महिलेला परप्रांतीय मुजोर कर्मचार्‍याने जाळून मारले तरी ब्रशब्द काढाय तयार नाहीत. खा. सौ. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून आपल्या भावना व संताप व्यक्त केला. मात्र, स्थानिक नेत्यांच्या मौनी भूमिकेबाबत सामान्यांमध्ये संतापाची लाट आहे.