Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Satara › शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आंदोलनापासून दूर राहा : सदाभाऊ खोत

शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आंदोलनापासून दूर राहा : सदाभाऊ खोत

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 11:56PMमहाबळेश्‍वर : वार्ताहर

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचे भांडवल करून अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजल्या. परंतु, त्यांचे प्रश्‍न सुटले नाहीत. ज्यांनी राजकारण केले त्यांना खरेतर प्रश्‍न सोडवायचेच नव्हते. कारण प्रश्‍न सुटले तर यांचे राजकारणाचे दुकान कायमचे बंद होणार, ही भीती त्यांना वाटत होती. शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या आंदोलनापासून ‘रयत क्रांती’च्या कार्यकर्त्यांनी दूर राहावे, असे आवाहन रयत क्रांती संघटनेेचे अध्यक्ष व जिल्हा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

रयत क्रांती संघटनेच्या कार्यकारिणी पदाधिकार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर येथील  कै. भाऊसाहेब माळवदे सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप मंत्री खोत यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘रयत क्रांती’चे प्रदेशाध्यक्ष   शिवनाथ जाधव, उपाध्यक्ष राहुल मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष शार्दुल जाधव, सागर खोत, दीपक भोसले, रवींद्र खोत आदी उपस्थित होते. 

ना. खोत म्हणाले, येथून गेल्यानंतर तळागाळातील लोकांचे, शेतकर्‍यांचे तसेच पाणी, आरोग्य, शिक्षण, बेकारी हे प्रश्‍न हाती घ्या, ते सोडविण्यासाठी आक्रमकपणे काम करा. वैचारिक संघटन तयार करा. बुद्धिवादी लोकांनाही आपल्या या संघटनेचा हेवा वाटला पाहिजे त्याच वेळी गुंडांनाही या संघटनेचा धाक वाटला पाहिजे, अशी संघटना बांधा. केवळ निवडणुकांसाठी रस्त्यावर उतरू नका तर सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्‍नासाठी लढत रहा.

पुढील काही महिने तुम्हाला आंदोलने तीव्र करावी लागणार आहेत. पहिले आंदोलन उसाच्या दरासाठी करा. उसाला ‘एफआरपी’प्रमाणे कारखान्यांनी दर दिलाच पाहिजे, या साठी दि. 28 मे रोजी कारखान्यांवर मोटारसायकल मोर्चा काढण्यात येईल. कडधान्ये नियमन मुक्‍त करण्यासाठी संघटना दुसरे आंदोलन करणार आहे. दि. 1 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल.आमच्या शेतात पिकलेले कडधान्य आम्ही कोणालाही विकू शकतो, शेती उत्पन्न बाजार समितीमध्येच कडधान्य देण्याची सक्‍ती आता यापुढे नको, असेही ते म्हणाले. 

मी मंत्री झालो तेव्हा अनेक संकटे निर्माण केली गेली. परंतु, मी संयमाने त्याला तोंड दिले. त्यावेळी तुम्ही माझ्याबरोबर राहिला. संघटनेचे सदस्य हेच माझे वैभव आहे. तुम्हीच माझे कुटुंब, असे म्हणत ना. खोत भावूक झाले. यापुढेही जनतेची बाजू घेऊन एकलव्याप्रमाणे लढत राहीन, असेही ते म्हणाले.

स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र होणार

दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनुदानाच्या यादीत स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश केला आहे. सुमारे 2 हजार हेक्टर क्षेत्रातील या पिकाला अनुदान मिळणार आहे. भविष्य काळात या पिकाचे संशोधन केंद्रही येथे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री खोत यांनी दिली.