Wed, Apr 24, 2019 00:17होमपेज › Satara › लघु पाटबंधारे विभाग : सुमारे २ कोटींपैकी अवघे १० लाख खर्च 

लघु पाटबंधारे विभाग : सुमारे २ कोटींपैकी अवघे १० लाख खर्च 

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 11:01PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून लघु पाटबंधारे विभागासाठी 1 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीपैकी फक्त 10 लाख 66 हजार रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेला 1 कोटी 87 लाख 34 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास  लघु पाटबंधारे विभागाचा  येत्या 12 दिवसात चांगलाच कस लागणार आहे. तसेच सदस्यांनीही उशिरा कामे सुचवल्याने कामांना वर्कऑर्डर नुकत्याच देण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे.

सध्या जिल्हा परिषदेच्या  लघु पाटबंधारे विभागातील कामांना फार महत्व प्राप्त झाले आहे. लघु पाटबंधारे विभागामार्फत 0 ते 100 हेक्टरमधील कामे अल्प कालावधीत पूर्ण  होत असल्याने त्याचा लाभ त्वरित शेतकर्‍यांना होत असतो. यामध्ये  पाझर तलाव, ग्राम तलाव, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, साठवण बंधारे, वळण बंधारे, साठवण तलाव अशी कामे केली जातात.

0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेमधील लघू पाटबंधार्‍यांची कामे जिल्हा परिषदेमार्फत शासनाच्या विविध योजनांमार्फत राबवली जातात. यासाठी सातारा जिल्हा परिषदेकडे लघू पाटबंधारे विभाग असून त्या अंतर्गत 11 तालुक्यातील लघु पाटबंधारेची कामे लघु पाटबंधारे उपविभाग सातारा, खटाव, फलटण, कराड व खंडाळा अशा 5 व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कोरेगाव, वाई व जावली या तीन उपविभागामार्फत केली जातात.

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून लघु पाटबंधारे विभागामधील विविध कामांसाठी निधी दिला जातो. त्यानुसार लघुपाटबंधारे विभागास जिल्हा परिषदेच्या  स्वनिधीतून  1 कोटी 98 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून  कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांची दुरूस्ती करणे, वळण बंधार्‍यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव, ग्रामतलाव व साठवण  बंधार्‍यांच्या दुरूस्तीची कामे घेतली जातात. त्यापैकी लघु पाटबंधारे विभागाच्या विविध कामासह स्त्रोत बळकटीकरणासाठी आतापर्यंत सुमारे 10 लाख 66 हजार रुपयांचा निधीच खर्च झाला असल्याचे समोर आले आहे. मंजूर रकमेमध्ये गतवर्षीच्या म्हणजेच  सन 2016 व 17 च्या 23 कामांचे 45 लाख 22 हजार रुपयांचा निधीही शिल्लक आहे.

लघु पाटबंधारे विभागामार्फत जिल्ह्याच्या विविध ठिकाणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्‍यांची दुरूस्ती करणे, वळण बंधार्‍यांची दुरूस्ती करणे, पाझर तलाव, ग्रामतलाव व साठवण  बंधार्‍यांच्या दुरूस्तीची सुमारे 51 कामे सुरू आहेत.

जिल्हा परिषदेचे जिल्ह्यात 64 गट आहेत. त्यामुळे गटातील प्रत्येक गावातील कोणती कामे घ्यावयाची हे जिल्हा परिषद सदस्य लघुपाटबंधारे विभागाला सूचवत असतात. मात्र ही कामे दिलेल्या वेळेत ल.पा.कडे आली नाहीत. त्यामुळे या कामावरील  निधी वेळेत खर्च झाला नाही. सध्या मंजूर कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील काही कामांना वर्क ऑर्डर देण्यात आली आहे तर  काही कामे प्रगतीपथावर असून सर्व कामे मार्चअखेर पूर्ण करण्याची कार्यवाही लघु पाटबंधारे विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे निधी खर्च करण्यात ल.पा.चा चांगलाच कस निघणार आहे.

 

Tags : satara, satara news, satara zp, irrigation department, ses fund