Tue, May 26, 2020 18:57होमपेज › Satara › लग्नासाठी एका मुलीच्या अनेक कुंडल्या

लग्नासाठी एका मुलीच्या अनेक कुंडल्या

Published On: Dec 13 2018 1:43AM | Last Updated: Dec 12 2018 10:12PM
रेठरे बु : दिलीप धर्मे 

सध्या मुला,मुलींचे लग्न जुळविणे कठीण होऊन बसले आहे. हवे तसे स्थळ मिळत नसल्याने अनेकजण चिंतेत आहेत. याचा गैरफायदा घेत व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर मुला- मुलींची बोगस माहिती देवून नातेवाईकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. एकाच सुंदर मुलीच्या वेगवेगळ्या कुंडल्या तयार केल्या जात असल्याचेही समोर आले आहे. 

नांदेड,नागपूर,औरंगाबाद, बुलढाणा येढील हे एजंट असल्याचे समजते. मनासारखे स्थळ मिळावे अशी मुला- मुलीपासून घरातील सर्वांचीच इच्छा असते. वधू -वर सूचक केंद्रांचा आधार घेवून तेथूनच इच्छुकांची नावे व मोबाईल नंबर एजंट मिळवत आहेत. 

जात, धर्म, शिक्षण, व्यवसाय, अपेक्षा व राहण्याचे ठिकाण या नुसार पद्धतशिरपणे मिळती जुळती माहिती पत्रिता तयार केली जात आहे. मुलांना   सातारा,सांगली,कोल्हापूर तसेच पुणे, मुंबई या ठिकाणी स्थळ असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः त्या पत्रिकेवर फक्त त्या मुलीचे नाव, तिची जुजबी माहिती व शहराचे नाव देण्यात येत आहे. पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर न देता अपुरी माहिती दिली जात आहे. संपूर्ण फी भरल्यानंतरच सर्व माहिती देण्यात येईल अशी अट घालण्यात येत आहे.

लग्न ठरावे शिवाय मुलगीही रूपवान मिळत असल्याने नातेवाईक पैसे भरत आहेत. त्यासाठी नांदेड ,नागपूर, औरंगाबाद, बुलढाणा आदी ठिकाणचा बँक अकौंट नंबर दिला जात आहे. एकदा का ते पैसे खात्यावर जमा झाले की पुढच्या दोन,चार दिवसानंतर तो मोबाईल बंद लागतो. 

बँकेत चौकशी केली असता ते खाते बंद झाल्याचे सांगितले जाते.अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.परप्रांतिय टोळीकडून लग्न जुळविण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेकजण याला बळी पडले आहेत. लग्न ठरणे दूरच पण पैसे गेले, मानसिक त्रास सहन करावा लागला तो वेगळाच. अब्रुच्या भितीने मुलाचे नातेवाईक याबाबत तक्रारी करत नसल्याने एजंटांचे चांगलेच फावले आहे.  

व्हॉट्सअ‍ॅपमुळे बोगसगिरी उघडकीस..

मुलीच्या माहिती पत्रिकेवर  तिचा फोटो व शहराचे नाव होते. अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित युवकाने ती माहिती पत्रिका मित्राच्या हॉट्अ‍ॅप गु्रपवर टाकली तेंव्हा, त्याच मुलीच्या वेगवेळ्या माहित पत्रिका तयार करण्यात आल्याचे समोर आले. ही बोगसगरी असल्याचे युवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने नाद सोडून दिला. नाव न छापण्याच्या अटीवर युवकाने ही माहिती दिली.