Sat, Jun 06, 2020 06:40होमपेज › Satara › सातारा : शिरवळला भंगार गोदामात अग्नितांडव(Video)

सातारा : शिरवळला भंगार गोदामात अग्नितांडव(Video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिरवळ : वार्ताहर

शिरवळ (ता. खंडाळा) येथील महामार्गालगत असलेल्या भंगार गोदामास शनिवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. या अग्नितांडवात सुमारे 40 लाखांचे साहित्य भक्षस्थानी पडल्याचा अंदाज आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. तब्बल सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पाच-सहा टँकरने साडेचार ते पाच तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. 

पुणे-सातारा महामार्गावरील एका भंगाराच्या गोदामाला पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. गोदामात असलेल्या बिसलरी पाण्याचे टेरीचे गठे, पुठ्ठे, प्लास्टिक, आईल, टेमकल डबे यांनी पेट घेतल्याने आग भडकली. यासह दोन मशनरीही जळून खाक झाल्या. धुराचे आणि ज्वालांचे लोट गोदामातून दिसू लागल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशामक दलाशी संपर्क साधल्यानंतर फलटण, वाई, महाबळेश्‍वर, खंडाळा, किसनवीर साखर कारखाना, एशियन पेन्ट कंपनी अशा सहा अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी पाचारण झाले. याशिवाय शिरवळ येथील पाण्याचे टँकरही याठिकाणी आले. सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत आग आटोक्यात येण्यासाठी सर्व बाजूने पाण्याचा मारा केला. घटनास्थळाशेजारील भंगार गोदाम, फर्निचर, टिंबर्स,  मोटारसायकल, सिमेंट व किरकोळ विक्री दुकानेे यांचे मालकही या अग्नितांडवामुळे भयभीत झाले होते.  6 वाजल्यापासून साडेदहापर्यंत तब्बल साडेचार ते पाच तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली.

दरम्यान, दिवसभरात घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. शिरवळ पोलिस ठाण्यासमोर घडलेल्या भीषण आगीत भंगार गोदाम जळून खाक झाले तरी याबबातची कोणतीही फिर्याद दाखल न झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

शिरवळमध्ये अग्निशमन दलाची गरज

शिरवळ येथील वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण पाहता, या ठिकाणी अग्निशमन दलाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. शिरवळ हद्दीतील कलर कंपनी, गावडेवाडी भंगार गोदाम या घटनांनंतर शनिवारची ही तिसरी घटना आहे. दोन्ही घटनांनंतर हा मुद्दा उपस्थित झाला होता. परंतु, पुढे त्याचा विसर पडला. आता शनिवारच्या अग्नितांडवानंतर पुन्हा हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. आग लागल्यानंतर पाण्यासाठी धावाधाव करण्यापेक्षा वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिरवळ परिसरात छोट्या-मोठ्या 30 हून अधिक कंपन्या व उद्योग आहेत. ग्रामपंचायतीने या कंपन्यांच्या सहाय्याने अग्निशमन बंबासाठी निधी उभारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

Tags : satara, satara news, shirwal, shirval fire


  •