Fri, Aug 23, 2019 21:22होमपेज › Satara › वाठार निंबाळकर येथे भीषण आग कोट्यवधीचे साहित्य जळून खाक

वाठार निंबाळकर येथे भीषण आग कोट्यवधीचे साहित्य जळून खाक

Published On: Sep 01 2018 1:48AM | Last Updated: Aug 31 2018 10:43PMफलटण : प्रतिनिधी

वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील आयुर ट्रेडर्सला पहाटे दीड च्या सुमारास अचानक आग लागून झालेल्या दुर्घटनेत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून कंपनीतील सुमारे 13 कोटीचे साहित्य व वाहनांचे नुकसान झाले आहे.ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचा अहवाल अग्निशमन विभागाकडून अथवा महावितरणच्या अधिकार्‍यांच्या अहवालातून स्पष्ट होईल, असे तहसीलदार विजय पाटील यांनी सांगितले. दरम्यान ही आग एवढी भिषण होती की सुमारे 10 एकर परिसरात ही आग पसरली होती.

फलटण-पुसेगाव रोडवर असणार्‍या आयुर ट्रेडर्सला मध्यरात्री आग लागली. कंपनी आवारामध्ये लावलेल्या वाहनांचे टायर आगीमुळे फुटून मोठे आवाज झाल्यानंतर ही आग लागल्याचे दिसून आले. आगीवेळी जोराचे वारे वाहत असल्याने ती चांगलीच भडकत होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थिंचे प्रयत्न केले गेले मात्र, आग वेगाने  पसरत गेली. त्यानंतर अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले. फलटण नगरपालिका अग्निशमन दलाच्या अधिकारी व कर्मचारी यांना पहाटे 3 च्या दरम्यान दूरध्वनीद्वारे ही माहिती मिळताच अग्निशमन यंत्रणा तातडीने घटनस्थळी दाखल झाली. मात्र, आग एवढी भिषण होती की कंपनीचा संपूर्ण परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या आगीमध्ये कंपनीत पार्क केलेली सात वाहने व सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी घडली नाही. 

घटनेनंतर तहसीलदार विजय पाटील व महावितरणचे अधिकारी राजदीप यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना दिल्या. गावकामगार तलाठी नाबर व त्यांच्या सहकार्‍यांनी पंचनामा केला असून पोलीस रामदास लिमण व संजय राऊत  ही आग कशामुळे व कशी  लागली? याचा तपास करीत आहेत. यावेळी कंपनीचे मालक दिगंबर आगवणे, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.