Wed, Jan 22, 2020 18:49होमपेज › Satara › गावटग्यांकडून देणगीच्या नावाने लूट

गावटग्यांकडून देणगीच्या नावाने लूट

Published On: Feb 11 2019 1:28AM | Last Updated: Feb 10 2019 11:09PM
सातारा : विशाल गुजर 

कोणत्याही प्रकारची वर्गणी गोळा करण्यासाठी संबंधित संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक असते. मात्र धर्मादाय खातेच गांधारीच्या भूमिकेत राहिल्याने गावोगावी गावटग्यांनी धार्मिकतेच्या नावावर मोठ्या प्रमाणात लुटमार सुरु केली आहे. संस्थेची नोंदणी नसताना बनावट पावती पुस्तकांच्या माध्यमातून भाविकांकडून लाखो रुपयांच्या वर्गणी गोळा करुन त्या हडप होत असल्याने भक्तांची ही एकप्रकारे फसवणूकच आहे. 

आजच्या धकाधकीच्या युगातही अगदी गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत लोकांची परमेश्‍वरावर श्रध्दा आहे. विविध ठिकाणी होत असलेल्या यात्रा, जत्रांमधून याचा प्रत्यय आपणास येत असतो. देव आहे का नाही हा संशोधनाचा विषय असला तरी आजही देवावर श्रध्दा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, लोकांच्या याच श्रध्देचा पुरेपूर फायदा घेत काही बिनकाम्यांनी आपली दुकानदारी सुरु केली आहे. धार्मिक स्थळाचा विकास करायचा आहे, मंदिर बांधायचे आहे, कंपाउंड करायचे आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे, पेव्हर ब्लॉक बसवायचे आहेत, वृक्षारोपण करायचे आहे, लाईट फिटींग करायचे आहे, मंदिराचा जीर्णोध्दार करायचा आहे, कलर द्यायचा आहे आदी कामे सांगून भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात येत आहे. 

वास्तविक एक रुपया देणगी स्वरुपात घ्यायचा असेल तरी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे संबंधित संस्थेची नोंदणी आवश्यक असते. संस्थेला आरएनआय नंबर मिळाल्यानंतर संबंधित संस्था धर्मादाय खात्याने घालून दिलेल्या नियमानुसार देणगी गोळा करु शकते. मात्र, अनेक ठिकाणी धार्मिकतेच्या नावाखाली हा नियम पायदळी तुडवला जात आहे. धर्मादाय खात्याची कसलीही परवानगी न घेता बनावट पावती पुस्तकांच्या माध्यमातून लाखो रुपयांची माया गोळा करुन काहींनी आपला संसार थाटला आहे. भाविकही अशा संधीसाधूंच्या नादाला लागून श्रध्देपोटी देणगी देत आहेत. मात्र प्रत्यक्षात या देणगीचा विनियोग कुठे होतो? आपणाकडे देणगी मागायला येणारे अधिकृत व्यक्ती आहेत का? पावती पुस्तकावर धर्मादाय खात्याकडून नोंदणी क्रमांक आहे का? याचा विचारही न करता केवळ श्रध्देपोटी भाविक देणगी देत आहेत. अनेक ठिकाणी या देणग्यांची लाटालाटी सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. 

वास्तविक धर्मादाय खात्याचे अशा बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष असणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्या पुढे मांडलेली कामेच त्यांना पूर्ण होताना दिसत नाही. आणि जर कोणी तक्रार केलीच तर त्या तक्रारीची पण फारशी दखल घेतली जात नाही. ग्रामीण भागात सर्रास बनावट पावत्यांद्वारे लूटमार सुरु आहे. देणगीदार विविध ठिकाणचे असल्याने या संधीचा फायदा घेवून त्यांना वेगवेगळी कामे करायची आहेत असे सांगून मोठ्या प्रमाणात फंडींग गोळा करण्यात येत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी धर्मादाय खात्याने डोळ्यावरील पट्टी काढण्याची गरज आहे. 

धार्मिक स्थळांच्या विकासासाठी शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. त्यामुळे शासनाकडून होणारी कामेही आम्हीच केली असे म्हणत बोगसगिरीचे प्रकारही सध्या सुरु आहे. याशिवाय काही दानशूर व्यक्तीही मंदिरांच्या जीर्णोध्दाराची संपूर्ण जबाबदारी घेवून मंदिर उभारणी करतात याचाही प्रत्यय अनेक ठिकाणी आला आहे. काही भाविक स्वत: एखादे काम पूर्णत्वास लावतात. मात्र बोगस पावती पुस्तके छापून झालेली सर्व कामे याच देगणीतून झाली असे भासवण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. त्यामुळे अशा प्रकाराला आळा घालून धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेली लूट थांबवण्यासाठी धर्मादाय खात्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.