Thu, Apr 25, 2019 08:05होमपेज › Satara › केबल व्यावसायिकाची मायणीत आत्महत्या

केबल व्यावसायिकाची मायणीत आत्महत्या

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 11:12PMसातारा / मायणी : प्रतिनिधी

मायणी येथील केबल व्यावसायिक मोहन बाबुराव जाधव यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.  जि. प. सदस्य व मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे यांनी सातत्याने त्रास दिल्याने व केबल व्यवसाय करण्यास बंदी करत वाट लावण्याची धमकी दिल्याने मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद मायणी पोलिस ठाण्यात दाखल झाली. दरम्यान, आत्महत्येस सुरेंद्र गुदगे यांनी प्रवृत्त केले, अशा आशयाची चिठ्ठी त्यांच्या खिशात सापडल्याने गुदगे यांना अटक करावी, या मागणीसाठी जाधव कुटुंबीय व जमावाने मायणी दूरक्षेत्रासमोर ठिय्या दिल्याने वातावरण तणावपूर्ण राहिले. 

याबाबत मायणी दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी, सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास मोहन जाधव यांना उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने डॉ. उस्मान सय्यद यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले. पुढील उपचारासाठी विटा येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. विटा येथील सद‍्गुरू हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर विटा येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली. त्यानंतर सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, जाधव यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत सुरेंद्र गुदगे गत 6 वर्षांपासून मला सतत त्रास देत आहेत. बँकेचे कर्ज भरुनसुद्धा मला चेक बाऊन्सच्या केसमध्ये अडकवले. कर्जावेळी मी सह्या करुन कोरे चेक दिले होते.

त्यातीलच एक चेक बाऊन्स करुन मला त्रास दिला.  माझा केबलचा व्यवसाय असून त्याबाबत प्रशासनाकडे खोट्या तक्रारी करुन माझी ते नाहक बदनामी करत आहेत. मला राजकीय आकसाने त्रास देत आहेत. त्यांच्या तक्रारी प्रशासनाने निकालात काढल्याने राग मनात धरुन तू केबलचा व्यवसाय कसा करतो? तेच पाहतो. तुला धंदा करुन देणार नाही, तुझी वाट लावतो, अशी धमकी दिली. या सर्व जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे मोहन जाधव यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. 

या चिठ्ठीवरुन मोहन जाधव यांचे चिरंजीव राजाराम जाधव यांनी मायणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद केली आणि मृतदेहासह पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. गुदगे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अशी मागणी जमावाने केल्याने वातावरण तणावाचे बनले. पोलिस उपअधीक्षक यशवंत काळे घटनास्थळी पोहचल्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. आरोपीला अटक केले जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिल्यानंतर जमावाने मृतदेह अंत्यविधीसाठी नेला. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. रात्री 8 नंतर मृतदेहास अग्‍नी देण्यात आला.