Mon, May 20, 2019 18:03होमपेज › Satara › प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे; अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा केला गौरव

अण्णा भाऊंच्या कार्यापासून प्रेरणा घ्या

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 9:08PMकराड : प्रतिनिधी

फक्त दीड दिवस शाळेत जाऊनही अण्णाभाऊ साठे यांचे पाऊणशेपेक्षा अधिक ग्रंथ आहेत. त्यामुळे अण्णाभाऊ यांच्या चरित्राकडे पाहिल्यास जगातील कोणीही थक्क झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे त्यापासून युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले आहे.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, डॉ. शरद गायकवाड, गजानन सकट, प्रकाश वायदंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. साळुंखे म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेल्या ग्रंथांकडे पाहिल्यानंतर त्यांची विलक्षण प्रतिभा लक्षात येते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घडवलेल्या इतिहासामुळे अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र, कार्य प्रेरणादायी असल्याचे डॉ. साळुंखे यांनी यावेळी सांगितले.

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य तसेच लेखणीतून लोकांचे प्रबोधन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसह राज्याला दिशा देण्याचे काम त्यांच्या साहित्यामुळे झाल्याचे आ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शरद गायकवाड यांनी 77 पुस्तकांद्वारे समाज परिवर्तनात उल्लेखनीय कार्य करणार्‍या अण्णाभाऊ यांच्यापासून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. प्रारंभी आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रकाश वायदंडे यांच्यासह संयोजन समितीतील सदस्यांनी आपले मत व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी नागरिक, मान्यवर उपस्थित होते.