तिघांचा बळी; १३ पॉझिटिव्ह

Last Updated: Jun 03 2020 1:22PM
Responsive image
संग्रहित छायाचित्र


सातारा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे.  बुधवारी फलटण तालुक्यातील कोळकी येथील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला. याचबरोबर खटाव तालुक्यात मुंबईवरून आलेल्या दोन संशयितांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या 24 झाली आहे. तर 13 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा 571 झाला. पूर्वीच्या 208 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून आणखी 254 नवे संशयित दाखल झाले. तर तीन जणांचा मृत्यू पश्‍चात रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात मुंबई-पुण्यासह अन्य जिल्ह्यांतून नागरिक जिल्ह्यात दाखल झाल्याने दिवसेंदिवस बाधितांचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. गेले काही दिवस मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसह बाधित रुग्णांच्या गावातील नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत.  बुधवारी फलटण तालुक्यातील कोळकी येथे मुंबईवरून प्रवास करून आलेला 54 वर्षीय कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर वडूज येथील 57 वर्षीय पुरूष व गुरसाळे, ता. खटाव येथील 73 वर्षीय पुरूष या दोन संशयितांचाही मृत्यू झाला. 

याचबरोबर भोगाव ता. वाई येथील 85 वर्षीय महिला, गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिलेचा व वेळेकामथी ता. सातारा येथील 59 वर्षीय पुरुष अशा तिघांचा मृत्यू पश्‍चात घेण्यात आलेला नमुना निगेटिव्ह आला आहे.

दिवभरात कोरेगाव तालुक्यातील कठापूर येथील 62 वर्षीय पुरुष, 24 व 55 वर्षीय महिला असे तीन, जावलीतील वहागाव येथील 34 वर्षीय पुरुष, काटवली येथील 29 वर्षीय पुरुष व 56 वर्षीय महिला असे तिघे बाधित आढळले आहेत. सातारा तालुक्यातील वावदरे येथील 45 वर्षीय महिला तर मूळचा माजगाव पण थेट कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल असलेला 35 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील जांभेकरवाडीतील 2 वर्षीय बालक, दिवशी मारुली येथील 29 वर्षीय पुरुष तर कराड तालुक्यातील पाल येथील 55 वर्षीय पुरुष व तुळसण येथील 62 वर्षीय पुरूष यांना कोरोनाची बाधा झाली आहे. 

खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 55 वर्षीय महिला, माण तालुक्यातील दहिवडी येथील 19 वर्षीय युवक, फलटण तालुक्यातील कोळकी येथील 54 वर्षीय सारी आजाराचा पुरुष रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. याचबरोबर कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 5, खावली येथून 4 व सह्याद्री हॉस्पिटलमधून 12 जण कोरोनामुक्‍त झाले. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोनामुक्‍तांचा आकडा 235 झाला आहे. 

बुधवारी 13 पॉझिटिव्ह सापडल्याने जिल्ह्याचा बाधितांचा आकडा 571 झाला असून आतापर्यंत 324 बाधितांवर आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. नव्या 254 संशयितांच्या घशातील स्रावाचे नमुने एन.सी.सी.एस. पुणे येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कृष्णातून ५, सह्याद्रीतून ३ रुग्णांना डिस्चार्ज

कराड : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा हॉस्पिटलमधून सलग तिसर्‍या दिवशी कोरोनामुक्‍त केलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  या हॉस्पिटलमधून 111 जणांना डिस्चार्ज मिळाला होता. बुधवारी यात आणखी 5 जणांची भर पडली असून हे सर्व रुग्ण कराड व पाटण तालुक्यातील आहेत. तर सह्याद्री हॉस्पिटलमधून कोरेगाव तालुक्यातील एका रुग्णासह कराड तालुक्यातील दोघांना डिस्चार्ज मिळाला आहे.

कराड तालुक्यातील इंदोली व उंब्रज येथील प्रत्येकी एका रुग्णाचा डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये समावेश आहे. याशिवाय गोकुळ - पाटण येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या सहायक कुलसचिव अर्चना कौलगेकर, दिगंबर कुलकर्णी, अमृता करंबळेकर, राधिका चिवटे यांच्या हस्ते कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

तर सह्याद्रि हॉस्पिटलमधून कोरोगाव तालुक्यातील भीमनगर-आसनगाव येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णासोबत वानरवाडी व म्हासोली येथील दोन रुग्णांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील 137 रुग्णांनी आजवर कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या सुमारे 183 इतकी आहे.