Mon, Aug 26, 2019 00:31होमपेज › Satara › टेंभू योजनेसाठी ९ कोटीचा निधी

टेंभू योजनेसाठी ९ कोटीचा निधी

Published On: Jan 19 2018 1:58AM | Last Updated: Jan 18 2018 10:28PMसातारा : प्रतिनिधी

ना. चंद्रकांत पाटील यांनी निर्णायक भूमिका घेऊन खटाव तालुक्यातील मायणी परिसरातील  16 गावे व माण तालुक्यातील शेनवडी, वरकुटे परिसरातील 19 गावांना टेंभूचे पाणी देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या कामासाठी पुनर्वसन खात्याकडून 9 कोटी 5 लाख रुपये मंजूर केले असल्याची माहिती डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.

मायणी तलाव परिसरातील गावे व माण पूर्व भागातील प्रस्तावित 16 गावांना पिण्यासाठी व पशुधनासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेतून पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाने विशेष बाब म्हणून 9 कोटी 5 लाख इतका निधी उपलब्ध करुन देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. या संदर्भात डॉ. येळगावकर यांनी गुरुवारी सातार्‍यात पत्रकार परिषद घेवून तर अनिल देसाई यांनी पत्रकाद्वारे आपली भूमिका विषद केली.

डॉ. येळगावकर म्हणाले, खटाव माणच्या पूर्व भागाला टेंभू पाणी योजनेतून निधी मंजूर झाला असल्याने 1995 पासून विधानसभेच्या बाहेर मुंबई उच्च न्यायालयात तसेच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मुंबई यांच्याकडे सातत्याने लढा देवून सातारा जिल्ह्यावर व पर्यायाने दुष्काळी माण, खटाव तालुक्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला.

प्राधान्याने टेंभू प्रकल्पातून दुष्काळी भागाला पाणी सुरूवातीलाच देणे गरजेचे होते. खटाव व माण तालुके हे अतितुटीच्या खोर्‍यातील कायम दुष्काळी असल्याने या निकषांचाही विचार होवून पाणी वाटप होणे गरजेचे होते. मात्र, लढा उभा केल्यावर पाण्याचे वाटप सुरूवातीलाच झाले. मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच दुष्काळी भागाला न्याय मिळाला, असल्याचे डॉ. येळगावकर यांनी सांगितले.

टेंभू योजनेला माझ्या आग्रहामुळेच महाराष्ट्र  जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ठिबक सिंचन हा कायदा लागू केला. सध्या असलेल्या  प्रकल्पामध्ये केवळ टेंभू योजनेला हा कायदा लागू झाला आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या  कृष्णा पाणी तंटा लवाद 2 अन्वये महाराष्ट्राला जे जादा पाणी कृष्णा नदीचे मंजूर झाले आहे. त्यातील  जास्तीत जास्त पाणी जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात आणून या भागावर असलेले आस्मानी संकट दूर करणे हा माझ्या लढ्याचा पुढचा भाग राहणार आहे. जिहे कठापूर उरमोडी व टेंभू उपसा या सर्व योजनेचे पाणी दुष्काळी भागात लवकरात लवकर आणण्यासाठी जिवाचे रान करणार आहे, असेही ते म्हणाले. 

मायणी धरणात पाणी आणण्यासाठी अर्धा किलोमीटर पाईपलाईन केल्यास जास्तीत जास्त 3 आठवड्याचा कालावधी लागणार आहे. या योजनेसाठी ना. चंद्रकांत  पाटील यांचेच खरे श्रेय आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अभिजीत येळगावकर व रमेश जाधव उपस्थित होते.

दरम्यान, अनिल देसाई यांनी  पत्रकात म्हटले आहे की, 9 कोटी 5 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला होता. तर त्यासाठी डॉ. दिलीप येळगावकर, आणि मी स्वतः पाठपुरावा केला होता.खटाव आणि माण तालुक्यातील 16 गावांच्या पाणी प्रश्‍नासाठी डॉ. दिलीप येळगावकर यांनी गेली अनेक वर्षे लढा सुरू ठेवला होता.

तर 2003 साली मी स्वतः हाच प्रश्‍न हाती घेवून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. पाणीप्रश्‍नी उभारलेल्या लढ्यामध्ये अनेकदा मी स्वतः सहभागी झालो होतो.  काही महिन्यांपूर्वी माण तालुका येथे माझ्या  भाजपा प्रवेशावेळी ना. चंद्रकांत पाटील यांनी 16 गावांच्या पाणी प्रश्‍नासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असा शब्द दिला होता. तो शब्द आज पूर्ण झाले आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे खटाव-माण तालुक्यातील जनतेच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ निवारण्यासाठी मदत होणार आहे. दुष्काळ संपवण्याचे भाजप सरकारने हे उचललेले पहिले पाऊल असून या सरकारने दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे खर्‍या अर्थाने काम केले असल्याचेही अनिल देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद केले आहे.टेंभू योजनेसाठी निधीला मान्यता मिळाल्यानंतर आ. चंद्रकांत पाटील यांना पेढ्याचा बॉक्स देताना अनिल देसाई.