Tue, Apr 23, 2019 19:34होमपेज › Satara › ९ ऑगस्ट ठरला मराठा क्रांतिदिन

९ ऑगस्ट ठरला मराठा क्रांतिदिन

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 11:02PMकराड : प्रतिनिधी

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कराडसह पाटण तालुक्यांत कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर युवक रस्त्यांवर उतरल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर नाक्यावर युवकांनी दिवसभर महामार्ग रोखून चक्‍काजाम केला. तर कृष्णा कॅनॉलवर मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याने सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. ओगलेवाडी येथे जनावरांसह मराठा बांधवांनी रस्त्यांवर ठिय्या मांडला. तर पाटणमध्ये आमदारांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता. काही भागांत रस्त्यांवर टायर पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता. किरकोळ प्रकार वगळता तणावपूर्ण शांततेत बंद पाळण्यात आला. दोन्ही तालुक्यांत सर्व दैनंदिन व्यवहार पूर्णपणे बंद होते.  

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपूसन राज्यभर आंदोलन सुरू आहे. ठिकठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. कराडमध्येही मराठा महिलांसह मराठा बांधवांनी सलग नऊ दिवस दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, मराठा समाजाने क्रांतिदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे आजचा बंद शांततेत पार पाडावा, असे आवाहन प्रशासन, पोलिस व मराठा समन्वय समितीने केले होते. गुरुवारी सकाळपासूनच लोकांनी स्वत:हून आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला.

सर्वत्र बंद शांततेत सुरु असतानाच सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मराठा युवकांनी भगवे झेंडे हातात घेऊन शहरातून मोटरसायकल रॅली काढली. यावेळी युवकांनी दिलेल्या घोषणांनी संपुर्ण शहर दणाणून गेले होते. शहरातील व्यापार्‍यांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट होती. याचवेळी कृष्णा कॅनॉलवर तुरळक स्वरूपात वाहतूक सुरु असल्याने काही युवक व महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी कॅनॉलवरच रस्त्यावर ठिय्या मांडला. काहीवेळात येथे सुमारे दोन हजाराहून अधिक जमाव जमल्याने तणांवाचे वातावरण निर्माण झाले. 

त्याचवेळी काही युवकांनी कोल्हापूर नाक्यावर महामार्गावरच ठाण मांडले. तर काही युवकांनी जुन्या कोयना पुलालगत पलाशा हॉलसमोर महामार्ग रोखला. येथील जमाव आक्रमक झाला होता. त्यामुळे डीवायएसपी नवनाथ ढवळे स्वत: पोलिस फौजफाटा घेऊन तेथे दाखल झाले. त्यांनी आक्रमक झालेल्या जमावाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जोरजोरात घोषणाबाजी देत त्यांनी महामार्गावरच तोडलेले झाड टाकून महामार्ग रोखला. दरम्यान, सुमारे आडीच ते तीन तासानंतर काही नागरिक व पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर येथील युवक रस्त्यावरून उठले. 

पलाशाजवळ महामार्गा रिकामा झाला असला तरी कोल्हापूर नाक्यावरील जमाव तेथून हलण्याचे नाव घेत नव्हता. त्यातच गावागावातून युवक कोल्हापूर नाक्यावर जमा होत होते. त्यामुळे दिवसभर युवकांचा जमाव रस्त्यावर ठाण मांडून होता. त्यातच सातारा बाजुकडून कोल्हापूर बाजूकडे जाणारी वाहतूक सुरु झाल्याचे युवकांच्या लक्षात येताच त्यांनी सर्व्हिस रस्यावरून जाऊन सागर हॉटेलसमोर महामार्ग रोखला. यावेळी महामार्गावरील मालट्रक अडवून युवकांनी तो महामार्गावरच अडवा लावण्यास चालकाला भाग पाडले. त्यामुळे सुमारे पाच ते सहा ट्रक आंदोलनकर्त्यांच्या भीतीमुळे महामार्गवरच अडवे लावण्यात आले.  

महामार्गावर युवकांचा गोंधळ सुरु असल्याची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे पोलिस फौजफाट घेऊन तेथे दाखल झाले. त्यांनी युवकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, मराठा युवक अधिकच आक्रमक होत त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. काहीही झाले तरी आम्हाला न्याय मिळेपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही अशी भुमिका युवकांनी घेतली. तर दुसर्‍या बाजूला कोल्हापूर नाक्यावर महामार्ग रोखल्याने कराड-मलकापूरमध्ये महामार्ग पुर्णपणे ठप्प होता. आक्रमक मराठा समाज रस्त्यावर उठत नव्हता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मराठा युवकांनी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने सुमारे दोन किलोमीटर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.  कोल्हापूर नाक्यावर महामार्ग रोखणार्‍या आंदोलनकर्त्यांना साईराज हॉटेलचे मालक आप्पा सुर्वे यांनी दिवसभर पाण्याची सोय उपलब्ध करून दिली होती.

कराडकरांचे सामूहिक मुंडण

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कराडकरांनी सामूहिक मुंडण केले. ‘एक मराठा, लाख मराठा,’ अशा घोषणा देत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. कराड तालुक्यातील मराठा समाज बांधवांचे एक ऑगस्टपासून सुरू असणारे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. बंदवेळी शांतता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे कराडमधील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर दररोज पोहण्यासाठी येणार्‍या मराठा समाज बांधवांनी लोकशाही मार्गाने मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला. सुमारे पाच ते सहा समाज बांधवांनी मुंडण करत शासनाचे मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.