Thu, Apr 25, 2019 07:25होमपेज › Satara › जिहे कठापूर योजनेसाठी ८०० कोटी मंजूर

जिहे कठापूर योजनेसाठी ८०० कोटी मंजूर

Published On: Jan 05 2018 1:27AM | Last Updated: Jan 04 2018 10:35PM

बुकमार्क करा
वडूज : वार्ताहर

पिढ्यान्पिढ्या दुष्काळाचा सामना करणार्‍या खटाव व माण तालुक्यांतील शेतकरीवर्गासह सर्वच स्तरांतील नागरिकांसाठी सुवर्णकांचन योग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू व सहकार भारतीचे संस्थापक कै. लक्ष्मणराव इनामदार (खटाव) लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेल्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेस केंद्राने 800 कोटी रुपये मंजूर केले असून हा निधी राज्याकडे वर्ग करण्यात आला आहे. याच्या आनंदाप्रीत्यर्थ पुसेगाव येथील छ. शिवाजी चौकात फटाके वाजवून तसेच जिलेबीचे वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याबाबत पुसेगाव (ता. खटाव) येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप शासनाचे खास अभिनंदन करण्यात आले. यावेळी महेश शिंदे, विनोद इनामदार, सुहास जोशी, पुसेगाव सरपंच सौ. मुळे, उपसरपंच रणधीर जाधव आदी उपस्थित होते.

1997 साली युती शासनाच्या काळात खटाव-माण या कायम दुष्काळी तालुक्यांचा शेती पाणीप्रश्‍न कायमचा निकाली काढण्यासाठी जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेस (269 कोटी रुपये) मंजुरी दिली होती; मात्र त्यानंतरच्या आघाडी शासनाने या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. खटाव येथील कै.लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महेश शिंदे, विनोद इनामदार, सुहास शिंदे व ट्रस्ट पदाधिकार्‍यांनी या योजनेच्या पूर्णत्वासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यावेळी या योजनेचा खर्च 269 कोटी रूपयांवरून 1085 कोटी रूपयांवर पोहचला होता. हा प्रकल्प अनुशेषातून बाहेर काढणे व त्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामात विशेष लक्ष घातल्याने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, जलसंपदामंत्री महाजन, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून दि. 6 नोव्हेंबर 2017 ला या योजनेला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली. परंंतू यासाठी निधीची आवश्यकता होती, त्यासाठी भाजपाचे विनय सहस्त्रबुध्दे व ना. नितीन गडकरी यांच्याकडे ट्रस्टने पाठपुरावा सुरू ठेवला. याबाबत पंतप्रधान कार्यालयात निधीसाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री,पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविणसिंह परदेशी,जलसंपदा सचिव रा.वा.पानसे व पंतप्रधान कार्यालय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांची सविस्तर चर्चा होऊन खटाव-माण तालुक्यांसाठी संजीवनी ठरणार्‍या  जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेस 800 कोटी रूपयांची तातडीने मंजूरी दिली. हा निधी राज्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

यावेळी पं.स. सदस्या सौ. नीलादेवी जाधव,भरत मुळे, नितेश नलवडे, उपाध्यक्ष धीरज जाधव,विविध गावचे सरपंच, उपसरपंच व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे आभार, कृतार्थ झालो : महेश शिंदे

जिहे-कठापूर योजनेला निधी मिळावा, यासाठी मी स्वत: महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन व मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. या प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सहकार भारती, खटावच्या लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्ट, तसेच या भागातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मोठे श्रेय आहे. जिहे- कठापूर पूर्णत्वाला जाणे हे या भागातील जनतेचे स्वप्न आहे. मुख्यमंत्र्यांनी निधी मंजूर केल्याने मी त्यांचा जाहीर आभारी आहे. मी कृतार्थ झालो आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा नेते महेश शिंदे यांनी दिली.