Wed, Jul 24, 2019 12:34होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यातून ८ जण तडीपार; एसपींचा दणका

सातारा जिल्ह्यातून ८ जण तडीपार; एसपींचा दणका

Published On: Sep 06 2018 5:04PM | Last Updated: Sep 06 2018 5:04PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मारामारी, खूनाचा प्रयत्न करणार्‍या तीन टोळींवर जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कारवाईचा दंडूका उगारुन तडीपार केले. यामध्ये ८ जणांचा समावेश असून, एसपींचा एका महिन्यातील कारवाईचा दुसराच तडाखा आहे. दरम्यान, या कारवाईने सातारा शहरासह जिल्ह्यातील भानगडबाजांचे धाबे दणाणले आहे.

अमर श्रीरंग आवळे (वय, 32, रा.बुधवार नाका), सुजित उर्फ गण्या सदाशिव आवळे (वय 27, रा.बुधवार नाका, सातारा) या दोघांची टोळी आहे. अमिर फारुख शेख (वय 29, रा.मलकापूर), लाजम अल्लाउद्दीन होडेकर (वय 35, रा.गोटे), समीर ईस्माईल मुजावर (वय 28, रा.आगाशिवनगर सर्व ता.कराड) ही दुसरी टोळी आहे. गणेश शंकर निंबाळकर (वय 32), योगेश किसन निंबाळकर (वय 29), आदिनाथ यसाजी निंबाळकर (वय 35, सर्व रा.कोंडवे ता.सातारा) अशी वेगवेगळ्या टोळीतील तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

संशयित तिन्ही टोळ्यांवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील अमर आवळे, गणेश निंबाळकर व अमिर शेख टोळ्यांचे प्रमुख आहेत. संबंधितांविरुध्द शाहूपुरी, सातारा तालुका व कराड शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळीतील सदस्यांना पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्य जनतेला त्यांचा त्रास होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. यामुळे संबंधितांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करुन ते पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आले. यावर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हद्दप्राधिकरणापुढे सुनावणी झाली. गुरुवारी संबंधितांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश त्यांनी दिले. कारवाई झाल्यानंतर ४८ तासांच्या आत त्यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. दरम्यान, अद्याप तडीपार प्रलंबितांची यादी मोठी असून, अनेकांची तंतरली आहे.