Thu, Jun 27, 2019 14:10होमपेज › Satara › ८ ग्रामपंचायतींचा कौल कोणाच्या बाजूने

८ ग्रामपंचायतींचा कौल कोणाच्या बाजूने

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:28PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

पाटण तालुक्यात होत असलेल्या 11 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तीन ग्रामपंचायतींची सत्ता राखण्यात आ. शंभूराज देसाई गटाला यश मिळाले आहे. उर्वरित आठपैकी एका ठिकाणी रिक्‍त तर सात सरपंचपदांसाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये मल्हारपेठ, मंद्रुळकोळे व मंद्रुळकोळे खुर्द या तीन ठिकाणच्या निवडणुकांना यावेळी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यात आ. शंभूराज देसाई, आ. नरेंद्र पाटील, हिंदुराव पाटील यांच्यासह हर्षद कदम यांच्या प्रतिष्ठा व अस्तित्व पणाला लागले आहे. या टप्प्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीवर माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची सत्ता नसल्याने ते यावेळी थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. तरी  नेमक्या वेळी डाव टाकून सत्तांतरासाठी ही मंडळी तयारीला लागली आहेत. 

या टप्प्यातील अकरा ग्रामपंचायतींपैकी कळकेवाडी, नवसरवाडी, रामिष्टेवाडी या तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. येथे आ. देसाई गटाचीच सत्ता होती व ती अबाधित राहण्यासाठी त्यांना यश आले. येराडवाडी येथे त्यांच्याच गटाची सत्ता आहे. मात्र, यावेळी सरपंच पदासाठी इतर मागासवर्गीय महिला उमेदवारच मिळाला नसल्याने ही जागा रिक्‍त राहिली आहे. 

महत्त्वपूर्ण अशा मल्हारपेठ येथे आ. देसाई गटाची सत्ता आहे. येथे यावेळी तिरंगी लढत होत आहे. आ. देसाई यांच्यासह पारंपरिक पाटणकर गट या लढतीत शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनीही पॅनेल टाकून पारंपरिक गटांना आव्हान दिले आहे. हर्षद कदम यांचे पिताश्री मोहनराव कदम हे सलग दहा वर्षे पाटणकर व देसाई यांच्या सत्तेसाठी किंगमेकर ठरले होते.  याशिवाय आ. देसाई व कदम हे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत. मात्र, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते थेट ग्रामपंचायत यामध्ये पक्षांतर्गत गटबाजी त्यांच्याकडून उघड झाली आहे.  जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आ. देसाई गट यशस्वी झाला. आता ग्रामपंचायतमध्ये हर्षद कदम यांना स्वतःच्या गावात आपले अस्तित्व सिद्ध करावे लागणार आहे. त्यावरच त्यांची पक्षप्रतिष्ठा व आगामी राजकीय भवितव्य अवलंबून रहाणार आहे. 

मंद्रुळकोळे हे विधान परिषद आ. नरेंद्र पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे गाव. येथे सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. आ. नरेंद्र पाटील व पाटणकर गटाच्या याच सत्तेला शह देण्यासाठी हिंदुराव पाटील गट सक्रिय झाला आहे. त्याचवेळी आ. देसाई गट मात्र आगामी विधानसभा व त्यावेळच्या राजकीय सोयरीकीसाठी दोन पावले मागेच असल्याचे पहायला मिळत आहे. येथे या दोन पाटील घराण्यांची पारंपरिक लढत आहे. मात्र, तिरंगी लढतीचा फायदा व तोटा कोणाला हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मंद्रुळकोळे खुर्दची सत्ता काँग्रेसकडे असली तरी तीही आपल्याच ताब्यात घेण्यासाठी आ. नरेंद्र पाटील व त्यांचे बंधू यांनी  कंबर कसली आहे. या दोन्ही ठिकाणी पारंपरिक घराण्यांच्या लढतीत आ. देसाई किंवा पाटणकर गट तटस्थ राहिल, अशी शक्यता आहे.

मरळी या आ. देसाई यांच्या गावातच गतवेळेप्रमाणेच गटांतर्गत दोन पॅनेल पडली आहेत. यात अधिकृत कोणाला म्हणायचे हाच नेत्यांसमोर प्रश्‍न आहे. कारण गतवेळी अधिकृत मंडळींना फटका बसला आणि बंडखोरांची मनधरणी करावी लागली होती. नारळवाडी, गव्हाणवाडी, जमदाडवाडी या सत्ता आ. देसाई गटाकडेच आहेत व यावेळीही त्या त्यांच्याकडेच रहाण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे.