होमपेज › Satara › शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा : चंद्रकांत पाटील 

शिकण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवा : चंद्रकांत पाटील 

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:28PMकराड : प्रतिनिधी

पदवीदान समारंभ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील सर्वोच्च क्षण असतो. वैद्यकीय पदवी घेणारे विद्यार्थी आता सामाजिक क्षेत्रात पदार्पण करत असून, वैद्यकीय शिक्षणासारखे क्षेत्र निवडल्याचा सर्व विद्यार्थ्यांनी अभिमान बाळगावा. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना ज्ञान आत्मसात करण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू ठेवावी, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या 7 व्या दीक्षांत सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा होते. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, कृष्णा विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. नीलिमा मलिक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिणगारे, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य विनायक भोसले, मनिषा मेघे, दिलीप पाटील, डॉ. स्वप्ना शेडगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, पदवी मिळणे, हा काही अंतिम टप्पा नाही. तर ही एका नव्या प्रवासाची सुरूवात आहे. विशेषत: आरोग्य क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत तुम्ही जे पुस्तकातून शिकलात, ते ज्ञान आता प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करा, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले.

डॉ. सुरेश भोसले यांनी कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला. ते म्हणाले, विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये संशोधन संस्कृती रूजावी, यासाठी विद्यापीठ प्रशासन प्रयत्नशील आहे. शिवाय आमच्या संस्थेने नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव दिला असून, त्यासाठी स्वतंत्र असा महिला सक्षमीकरण विभाग सुरू करण्यात आला आहे. निर्णय प्रक्रियेतही महिलांना प्राधान्य देण्याचे धोरण संस्थेने स्विकारल्याचे त्यांनी सांगितले.

कुलपती डॉ. मिश्रा म्हणाले, स्व. जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कृष्णा अभिमत विद्यापीठाला डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या कुशल मार्गदर्शनाने उत्तुंग शिखरावर पोहचवले आहे. अशा नामांकीत संस्थेतून आज अनेक विद्यार्थी  पदवी घेऊन बाहेर असून, त्यांनी समाजात स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करायला हवी. त्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करा, असे आवाहनही डॉ. मिश्रा यांनी केले.

विज्ञान विभागप्रमुख डॉ. एस.  टी. मोहिते, दंतविज्ञान विभागप्रमुख डॉ. शशिकिरण एन. डी., फिजिओथेरपीचे विभागप्रमुख डॉ. जी. वरदराजुलु, नर्सिंग विज्ञानच्या विभागप्रमुख डॉ. वैशाली मोहिते यांच्यासह अभ्यास मंडळाचे सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी, पालक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वरगंधा जाधव सर्वाधिक पाच पदकांची मानकरी

स्वरगंधा शिवाजी जाधव या विद्यार्थीनीने सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी प्रदान करण्यात येणारे स्व. गोविंद विनायक अयाचित स्मृती सुवर्णपदक, डॉ. एम. एस. कंटक अ‍ॅवार्ड, डॉ. आर. एस. कोप स्मृती पुरस्कार, यू. एस. व्ही. पदक, डॉ. व्ही. के. किर्लोस्कर पुरस्कार पटकावून पाच पदकांची मानकरी ठरली. 

 

Tags : karad, karad news, Krishna Medical Science University, convocation