Sat, Jul 20, 2019 10:36होमपेज › Satara › झेडपीच्या ७२ शाळा बंद होणार?

झेडपीच्या ७२ शाळा बंद होणार?

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:46PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

राज्याच्या शिक्षण विभागाच्या व्याख्येनुसार गुणवत्ता नसलेल्या आणि पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यास सुरुवात झाली आहे. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 0 ते 10 पटाच्या सुमारे 72 शाळा बंद होण्याची शक्यता आहे? या शासकीय शाळा बंद करून त्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे समायोजन जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या  किंवा  खासगी अनुदानित शाळेत करता येणार आहे.

शिक्षण विभागाने प्रगती चाचण्यांना प्रमाण मानून शाळांच्या गुणवत्तेची व्याख्या निश्‍चित केली आहे. या व्याख्येत न बसणार्‍या आणि पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना पत्रे पाठवण्यात आली. शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनीही राज्यातील एक हजार  शाळा बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता शाळा बंद करण्यात येत आहेत. कमी गुणवत्तेमुळे पटसंख्या खालावत असलेल्या शाळा बंद करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

एकूण विद्यार्थी संख्या 0  ते 10  असलेल्या शाळा बंद होणार आहेत. या शाळातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे जवळच्या चांगली गुणवत्ता असलेल्या शाळेत समायोजन करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. बंद होणार्‍या शाळेच्या जवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची किंवा खासगी अनुदानित शाळेतही विद्यार्थी आणि शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची पदस्थापना, पुढील  समायोजन प्रक्रिया होईपर्यंत, विद्यार्थ्यांचे ज्या शाळेत समायोजन केले आहे त्याच शाळेत करण्यात येणार असल्याचे समजते.

सातारा जिल्ह्यात 0 ते 10 पटाच्या प्राथमिक शाळा किती आहेत? याबाबतचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले होते त्यानुसार सर्व्हेक्षणाचे अहवाल प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर येत्या  3 ते 4 दिवसांत प्राथमिक शिक्षण विभागाची शिक्षण सभापती राजेश पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांनी सांगितले.