Fri, Jul 19, 2019 07:06होमपेज › Satara › सत्तर ग्रामपंचायतींच्या जागा तिसर्‍यांदा रिक्‍त

सत्तर ग्रामपंचायतींच्या जागा तिसर्‍यांदा रिक्‍त

Published On: May 21 2018 1:19AM | Last Updated: May 20 2018 10:22PMपाटण : प्रतिनिधी

तालुक्यातील 72 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका तिसर्‍यांदा जाहीर झाल्या आहेत. मात्र, असे असूनही त्यांपैकी तब्बल 70 ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळेच आता या ग्रामंपचायतीच्या रिक्‍त जागांसाठी चौथ्यांदा निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये आरक्षित जागेवर उमेदवारच मिळत नसल्याने राजकीय गटांपुढील तसेच प्रशासनापुढील डोकेदुखीत भरच पडली आहे. 

पाटण तालुक्यात 72 ग्रामपंचायतींच्या रिक्‍त जागांसाठी तिसर्‍यांदा निवडणूक जाहीर झाली आहे. त्यांपैकी कोचरेवाडी व मानेगाव या दोन ग्रामपंचायतींसाठी केवळ तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यातही एक अर्ज अवैध ठरल्याने उर्वरित दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र, तिसर्‍यांदा निवडणूक जाहीर करूनही उर्वरित 70 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत.

माथनेवाडी, शिंगणवाडी, बोडकेवाडी, चव्हाणवाडी, जाधववाडी, बांधवट, पाबळवाडी, धायटी, तामिणे, पाळशी, पाणेरी, सातर, घोटील, कोळेकरवाडी, उमरकांचन, शितपवाडी, कराटे, नानेल, गोषटवाडी, गोठणे, कोदळ पुनर्वसन, धजगाव, शिंदेवाडी, डिगेवाडी, सांगवड, लुगडेवाडी, कसणी, पाचुपतेवाडी, डाकेवाडी, सुपुगडेवाडी, चव्हाणवाडी (धामणी), मस्करवाडी, मत्रेवाडी, असवलेवाडी, कवरवाडी, तामकडे, डोंगळेवाडी, आंबेघर तर्फ मरळी, काहीर, पाचगणी, गोकुळ तर्फ पाटण, वाडीकोतावडे, लेंढोरी, गुंजाळी, किल्ले मोरगिरी, काठी, घाणव, चाफोली, आंबवणे, कारवट, वाटोळे, कवडेवाडी, टोळेवाडी, मणदूरे, धडामवाडी, भिलारवाडी, मान्याचीवाडी, साबळेवाडी, शेंडेवाडी, चाळकेवाडी, चिखलेवाडी, डांगीष्टेवाडी, जळव, भुडकेवाडी, वेखंडवाडी, कळंबे, मंद्रुळ हवेली, जरेवाडी, हावळेवाडी, नहिंबे -चिरंबे या ठिकाणच्या 70 जागांचा समावेश आहे. 

वास्तविक या जागांसाठी यापूर्वी दोनवेळा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यावेळी येथे उमेदवार मिळाले नाहीत. तरीदेखील तिसर्‍यावेळी पुन्हा हा घाट घालण्याचा खटाटोप कशासाठी ? हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. याशिवाय जर त्या ठिकाणी जर संबंधित आरक्षित उमेदवारच नसतील, तर मग कितीही वेळा निवडणुका घेतल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे बोलले जात आहे. रिक्‍त जागांमुळे स्थानिक विकास कामांसह ग्रामस्थांपुढेही अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच या जागांवर इतरांना त्यावर काम करण्याची संधी मिळल्यास त्याचा ग्रामस्थांना फायदाच होईल, अशी चर्चाही ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

आरक्षित जागांवर उमेदवारच मिळत नाहीत ...

निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून या तिसर्‍यांदा पोटनिवडणुका घेत आहोत. संबंधित ठिकाणी त्या - त्या आरक्षणाचे उमेदवारच नसल्याने पुन्हा त्या जागा रिक्‍तच रहात आहेत. अपवादात्मक उमेदवार मिळतात. यावेळी 72 पैकी 2 ठिकाणी उमेदवार मिळाले व त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी सांगितले आहे.