Wed, May 27, 2020 07:57होमपेज › Satara › 7 जण मरकज रिटर्न; धाकधूक वाढली

7 जण मरकज रिटर्न; धाकधूक वाढली

Last Updated: Apr 01 2020 10:14PM
सातारा : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली (निजामुद्दीन) येथे मार्च महिन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या आठवड्यात पार पडलेल्या मरकजसाठी जिल्ह्यातून गेलेल्या 7 मुस्लिमबांधवांना विलगीकरण कक्षात (आयसोलेशन वॉर्ड) ठेवण्यात आले आहे. सातार्‍यातील 2 आणि कराडमधील 5 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. या सर्वांच्या घशातील स्रावाचे नुमने पुणे एनव्हीआय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कमालीचे दक्ष आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. परदेशातून आलेल्या लोकांची माहिती घेतली जात असून अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यावर लक्ष ठेवून आहेत. काहीजण माहिती दडवत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. दिल्लीत  निजामुद्दीन येथे मुस्लिम समाजाचा ‘मरकज’ मार्च महिन्यात पार पडला. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशपातळीवर हालचाली सुरु झाल्यानंतर मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात मरकज सोडून काही मुस्लिम बांधव परतले. दुसर्‍या आठवड्यानंतर दिल्ली शटडाऊनची घोषणा झाल्यानंतर काहीजण आपापल्या राज्यात घरी आले. मात्र काहीजणांनी मरकजला संपूर्ण उपस्थिती दर्शवली. त्यानंतर दोन-तीन दिवसांपूर्वी मरकजला उपस्थित राहिलेल्या बर्‍याच जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती प्रत्येक राज्यात देण्यात आली. संबंधित लोकांनी केलेल्या प्रवासाची, रहिवासाची, संपर्काची सर्व महिती घेण्यात येवून संबंधित जिल्ह्यात प्रशासनाला त्या प्रवाशांची यादी देण्यात आली. या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही मुस्लिम बांधवांची जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली.त्यामध्ये  सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातून 2 तर कराडमधून 5 जण दिल्ली (निजामुद्दीन) येथे मरकजला उपस्थित राहिल्याचे समोर आले. संबंधित लोक दि. 6 मार्चला मरकजसाठी गेले आणि त्यानंतर दि. 10 मार्चला ते परत आल्याची माहिती पुढे आली. संबंधित  सर्वांच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालय आणि कृष्णा हॉस्पिटल येथील आयसोलेशन  (विलगीकरण कक्ष) वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने घेवून  पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.  उर्वरित 6 लोकांचे नमुने प्रलंबित आहेत. त्यांचा वैद्यकीय अहवाल  लवकरच येणार आहे. संबंधित लोकांच्या कुटुंबांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. संबंधित लोक कुठे कुठे फिरले? याची माहिती घेण्यात आली आहे. या तपासणीत कोणतीही उणीव राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. जिल्ह्यात होम क्वारंटाईनमध्ये (अलगीकरण) 500 लोकांना ठेवण्यात आले आहे. काही लोकांना इंन्स्टिट्यूशनल कॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या संशयितांच्या स्रावांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत त्यांच्या 14 दिवसानंतरही तपासण्या केल्या जात असल्याचे प्रशानाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, मरकजसाठी गेलेल्या लोकांपैकी काहीजणांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘त्या’ बैठकीस हजेरी लावल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली.