Tue, Jul 16, 2019 12:09होमपेज › Satara › कृषी सिंचन योजनेत जिल्ह्यातील ७ प्रकल्प : पालकमंत्री शिवतारे

कृषी सिंचन योजनेत जिल्ह्यातील ७ प्रकल्प : पालकमंत्री शिवतारे

Published On: Jan 28 2018 1:32AM | Last Updated: Jan 27 2018 10:25PMसातारा : प्रतिनिधी

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत राज्यातील 26 प्रकल्प आहेत. त्यातील 7 प्रकल्प एकट्या सातारा जिल्ह्यातील आहेत.  त्यामुळे सातारा जिल्ह्याची हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच राज्य सरकार उपसा सिंचन योजनेचे जे वीज बील येईल त्यातील 81 टक्के वाटा उचलणार असून शेतकर्‍यांना केवळ 19 टक्के वीज बील भरावयाचे असल्याची माहिती पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांनी प्रजासत्ताक दिनी दिली. 

येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्त ना. शिवतारे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. ध्वजवंदनानंतर परेड कमांडर नंदा पराजे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, आ.शशिकांत शिंदे, आ. आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे,  अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, शहीद कुटुंबीयांचे वीर माता, वीर पिता व वीर पत्नी उपस्थित होते.

ना. विजय शिवतारे म्हणाले, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 26 प्रकल्प आहेत. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 7 प्रकल्पाचा समावेश आहे. यामध्ये धोम बलकवडी, मोरणा गुरेघर, तारळी, कुडाळी, वांग मराठवाडी, उरमोडी, जिहे कठापूरचा समावेश आहे. सात प्रकल्पामधील 66 बाधीत गावे असून 41 गावांचे पूर्णत: जमीन वाटप झाले असून 25 गावांना अशत: वाटप करण्यात आले आहे. जिहे कठापूर, निरा देवधर, उरमोडी, तारळी, धोम बलकवडी, टेंभू खोडशी हे मोठे उपसा सिंचन प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यामध्ये एकूण 796.76 दशला घनमीटर पाणीसाठा होत असून प्रकल्पांतर्गत सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर 1 लाख 13 हजार  870 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे. उरमोडी अंतर्गत माण कालव्याचे काम जून 2018अखरे पूर्ण होणार आहे. 

जलसंधारण व उपसा सिंचन योजनेचे बील परवडत नसल्याने 19 टक्के शेतकर्‍यांचा हिस्सा व उर्वरित हिस्सा शासन भरणार असल्याचे सांगून ते म्हणाले,  कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यांचे एकूण 1200 गेट आहेत. यातून एकूण 1 टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.  जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी मी प्रयत्नशील राहील. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनानं प्राधान्य दिलं आहे. त्यातून आपल्या जिल्ह्याला अधिकाधिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाहीही ना. विजय शिवतारे यांनी दिली.

दरम्यान, 1942 च्या चले जाव चळवळीच्या स्मारकाला पालकमंत्र्यांनी भेट दिली. या स्मारकाच्या विकासासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्यांनी दिल्या.

आकर्षक संचलन..., लक्षवेधक प्रात्यक्षिके

प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात विविध विभागांचे चित्ररथ, दिमाखदार परेड,  जिल्हा परिषद शाळांच्या वतीने  सादर केलेले लेझीम झांज पथकांची प्रात्यक्षिके, मल्लखांब प्रात्यक्षिके  सादर करण्यात आली.   परेड संचलनात विविध पथकांनी दिमाखदार संचलन केले. यामध्ये पोलिस, गृहरक्षक दल, पोलीस बॅण्ड पथक, सैनिक स्कूल, छाबडा सैनिक स्कूलचे संचलन, आरएसपी, विविध शाळातील विद्यार्थ्यांच्या पथकांचा समावेश होता. प्राथमिक शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सामाजिक वनीकरण आदी उत्कृष्ट चित्ररथांचे संचलन करुन योजनांची जनजागृती केली.

जिल्हाधिकार्‍यांचाही गौरव...

यावेळी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन 2016 मध्ये उत्कृष्ठ संकलन केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.