Fri, May 29, 2020 19:19होमपेज › Satara › ६७ गावे, ३८१ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ

६७ गावे, ३८१ वाड्या पाण्यासाठी व्याकूळ

Published On: Feb 14 2019 1:36AM | Last Updated: Feb 13 2019 11:35PM
सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचा प्रश्‍न बिकट बनल्याने आणखी 3  महिने  नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. माण, खटाव व कोरेगाव, फलटण तालुक्यातील 67 गावे व 381 वाड्या वस्त्यांमधील 1 लाख 4 हजार 804  नागरिकांना  व 27 हजार 668  जनावरांची तहान 64 टँकरवरच भागवावी लागत आहे.त्यामुळे पाणी टंचाईचे सावट आगामी काळात आणखी गडद होणार आहे.

दुष्काळी तालुक्यात पाण्याची मागणी  दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अत्यल्प पावसामुळे जलसाठ्यामध्ये  असलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच माण, खटाव व कोरेगाव तालुक्यातील काही भागात पाण्याची भिषण टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांना पाण्यासाठी मैलो न मैल भटकावे लागत आहे. 

अनेक गावांमध्ये प्यायला पाणी नाही, अशी अवस्था आहे. शासनाने ठिकठिकाणी टँकरमार्फत पाणीपुरवठा सुरू केला असला तरी ही केवळ पिण्याच्या पाण्याची सोय झाली. मात्र हे टँकर कधीच वेळेवर येत नाहीत. दुष्काळी भागातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. पाण्यासाठी अनेकांनी गावामधून स्थलांतर सुरू केले असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे.दुष्काळी तालुक्यात जलसंधारणाची  मोठ्या प्रमाणात कामे झाली असली तरी पावसाअभावी  जलसंधारणाचे स्ट्रक्‍चर पाण्यावाचून कोरडे पडल्याचे चित्र आहे. ओढे, विहीरी व नद्यांची पाणीपातळीही दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

माण तालुक्यातील पांगरी, बिजवडी, बिदाल, तोंडले, वडगाव, येळेवाडी, जाधववाडी, मोगराळे, पाचवड, राजवडी, पिंपरी, पळशी, भालवडी, खडकी, भाटकी, रांजणी, वरकुटे-म्हसवड, कारखेल, संभूखेड, बनगरवाडी, महाबळेश्‍वरवाडी, शेनवडी, विरळी, पानवन, परकंदी, टाकेवाडी, बोडके, कुकुडवाड, पुकळेवाडी अशी 47 गावे व शेळकेवस्ती, कापूसवाडी, लांडेवाडी, आटपाडकरवस्ती, बागलवाडी, जमालवाडी, लांडगोबा, मोरदरा, मुलाणीवस्ती, खरातवस्ती, बिरोबानगर, बेरडकी, जाधववस्ती, वाघाडी, चाफेमळा, लोखंडेवस्ती, धुळाची मळवी, बिरोबामंदिर परिसर, जाधववस्ती, निंबाळकरवस्ती, रामोशी आळी, चव्हाणवस्ती,आमजाई, सिध्दनाथमळा,डांगेवाडी, सत्रेवाडी, कदमवस्ती, इनामवस्ती, खरातवस्ती, काटकर बळीप वस्ती  या 361 वाड्यामधील  83 हजार187  नागरिकांना व 25 हजार 114  जनावरांना 50 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

खटाव तालुक्यातील गारवडी, मांजरवाडी,मोळ, मांडवे, पाचवड,गारूडी अशा 6 गावांना व आवळेपठार गावठाण, कठरेवस्ती, पाटीलवस्ती अशा 7 वाड्यांमधील 5 हजार 223 नागरिकांना,  981 जनावरांना 6 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी, बोधेवाडी, हासेवाडी, भाडळे, नागेवाडी, वाठारस्टेशन ,फडतरवाडी, मोरबेंद, जगतापनगर, भंडारमाची, अनभुलेवाडी या 11 गावातील 13 हजार 144  नागरिकांना 6 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. 

फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी, ठाकुरकी, गोळेगाव (पुर्नवसीत), मिरगाव या 3 गावांना व 13 वाड्यांमधील 3 हजार 250 नागरिकांना व 1 हजार 573 जनावरांना   2 टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली. माण 21, खटाव 21,कोरेगाव 3, फलटण 3 अशा मिळून 48 विहीरींचे अधिग्रहण प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.