Tue, Mar 19, 2019 09:16होमपेज › Satara › मुंबई उपनगरसह पुण्याची बाजी

मुंबई उपनगरसह पुण्याची बाजी

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 21 2017 11:14PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

येथील 66 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुरूष गटात गतविजेत्या पुणे संघाने अखेरच्या मिनिटाला कोल्हापूरचा चित्तथरारक अंतिम सामन्यात एका गुणाने पराभव केला. त्यामुळे मानाच्या श्रीकृष्ण चषकावर नाव कोरत सलग दुसर्‍या वर्षी विजेतेपद कायम राखण्यात पुणेला यश आले आहे. तर महिला गटात सलग 10 वर्ष विजेतेपद कायम राखणार्‍या पुणे संघाला मुंबई उपनगरने पराभवाचा धक्का दिला आहे. मुंंबई उपनगरने प्रतिष्ठेचा पार्वतीबाई सांडव चषक पटकावत पुणेकडून गेल्यावर्षी झालेल्या निसटत्या पराभवाची परतफेड केली आहे. 

आदरणीय स्व. पी. डी. पाटील जन्मशताब्दीनिमित्त कराडच्या शिवाजी स्टेडियमवर राज्य कबड्डी असोसिएशन व कराडचे लिबर्टी मजदूर मंडळ यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. महिला गटात मुंबई उपनगर आणि पुणे यांच्यात अंतिम सामना झाला. गेल्यावर्षी पुणे संघाने मुंबई उपनगरचा निसटता पराभव करत सलग 10 वर्ष विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम केला होता. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे, सायली जाधवसह स्टार खेळाडू मुंंबई उपनगरचे प्रतिनिधीत्व करत होत्या. याशिवाय कोमल देवकर हिच्यावरही उपनगरची भिस्त होती. तर दुसरीकडे सायली कोरिपाळे, किशोरी शिंदे, स्नेहल शिंदे यांच्यावर पुण्याची भिस्त होती. 

मात्र सामन्याच्या प्रारंभापासून मुंबई उपनगरने वर्चस्व राखले होते. मध्यतंरापर्यंत मुंबईकडे 20 विरूद्ध 11 अशी 9 गुणांची आघाडी होती. मध्यतंरानंतरही हीच स्थिती कायम राहिल्याने 30 विरूद्ध 23 असा 9 गुणांनी पुण्याला पराभव स्वीकरावा लागला. 

तर पुरूष गटात गतविजेते पुणे आणि कोल्हापूर यांच्यात चुरशीची अंतिम लढत झाली. मध्यतंरापर्यंत कोल्हापूर 13 तर पुणे 11 गुणांवर होता. मध्यतरानंतरही दोन्ही संघात चुरस कायम होती. पुणेकडून ऑल आऊट मिळाल्याने अखेरच्या मिनिटाला दोन्ही संघ 23 गुणांवर होते. मात्र त्यानंतर थर्ड रेडमध्ये प्रथम पुण्याचा शिवराज जाधव याने गुण मिळवत पुण्याला आघाडीवर नेले. त्यामुळे कोल्हापूरच्या तुषार पाटील यांच्या अखेरच्या चढाईकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याने एक गुण मिळवत पुण्याचा विजय लांबवत सामना टाय केला. 

त्यानंतर दोन्ही संघाना प्रत्येकी पाच चढाया देण्यात आल्या. यावेळी कोल्हापूरच्या विनायक शिवटे, अक्षय जाधव या चढाईपट्टूंना पुण्याने पकडले. तर महेश मगदूम, आनंदा पाटील, तुषार पाटील यांनी प्रत्येकी गुण मिळवत कोल्हापूरला 5 गुणांवर नेले होते. मात्र पुण्याच्या मोबीन शेख, अक्षय जाधव, सिद्धार्थ देसाई, विकास काळे आणि शिवराज जाधव या सर्वांनी गुण मिळवत केवळ 1 गुणाने रोमहर्षक सामन्यात कोल्हापूरचा पराभव करत विजेतेपद कायम राखले.