Wed, Mar 20, 2019 12:45होमपेज › Satara › जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्र बहरताहेत

जिल्ह्यात कृषी पर्यटन केंद्र बहरताहेत

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 8:49PMकराड : प्रतिभा राजे

आजच्या वैज्ञानिक जगतात पर्यटनाला अनन्यसाधारण महत्व आहे. कित्येक देशात पर्यटनाच्या संकल्पना बदलत आहेत. आजतागायत आर्थिक कुवत असणारेच पर्यटनाबाबत विचार करु शकत होते. ही संकल्पना आता बदलत असून त्याला नवे रूप प्राप्त झाले आहे. शहरी लोकांची ग्रामीण जीवनाची ओढ व शेती नसणार्‍या कुटुंबाला शेतीत रमण्याची हौस या पर्यटन केंद्रांनी भागवली आहे. तरूणांचा वाढत्या सहभागामुळे  सातारा जिल्ह्यात तब्बल 60 पर्यटन केंद्रे सध्या सुरू आहेत. 

कृषी व्यवसाय भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. कृषी व्यवसायावर जवळजवळ 80 टक्के लोक अवलंबून आहेत. शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनात भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे  ‘कृषी पर्यटन’. महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट) ने त्यासाठी पुढाकार घेतला. कृषी पर्यटन म्हणजे शेतावरील फेरफटका, आपल्या संस्कृतीची ओळख, निर्भेळ आनंद. शहरी जीवनशैलीचा उबग आलेल्या लोकांनी चार दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍याने शहरी लोकांचा सशुल्क पाहुणचार, आदरातिथ्य करणे म्हणजे कृषी पर्यटन.

कृषि पर्यटनाचा उगम ऑस्ट्रेलीया मध्ये 65 वर्षापूर्वी झाला.शहरी जीवनातील दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरांतील नागरिक कृषी पर्यटनाला प्राधान्य देतात आणि त्यांचे लक्ष ग्रामीण भागाकडे,खेडेगांवाकडे वळत आहे. शेती व्यवसायाला जोड व्यवसायाची साथ देऊन उत्पादनांत भर घालता येणारा हा प्रकल्प आहे. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची सुरूवात करणारे व यशस्वी कृषी पर्यटन राबवणारे शेतकरी एकत्र येवून शेतकर्‍यांनी हा व्यवसाय करावा हा विचार मांडला गेला व याकरिता व्यासपिठाची स्थापना करण्यात आली. दि. 12 डिसेंबर 2008 रोजी विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे ’महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ मर्यादित (मार्ट)’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ऑस्ट्रेलीयासारख्या विकसित देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया कृषी पर्यटन आहे. त्यामुळे कृषी पर्यटनाचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्रातील विविध भागांत शेतकरी प्रयत्नशील आहेत. ज्या गावात कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली, त्या परिसरातील अनेक स्थानिक उद्योगांना चालना मिळत आहे. शासनही आता या व्यवसायासाठी अनुदान देण्याच्या विचाराधीन आहे.

कृषी पर्यटन हा व्यवसाय सध्या जोम धरत आहे. स्वत: कष्ट करून मॅनेज करण्याचा हा व्यवसाय आहे. त्यामुळे मेहनतीची तयार असणार्‍या तरूणांसाठी हा व्यवसाय उत्तम आर्थिक प्राप्‍ती करून देणारा आहे. आपुलकीच्या सेवेवर सध्या  हे व्यवसाय सुरू  आहेत.  - चांगदेव बागल जिल्हा कृषी अधिकारी 

सर्वसाधारण 5 एकर जमीन व एकत्रित कुटुंब असणार्‍यांनी कृषी पर्यटन हा व्यवसाय करण्यास काहीच हरकत नाही. एकत्रित कुटुंबामुळे मालकच कामगाराचे काम करतात त्यामुळे पैशांची बचत होतेच पण आपुलकीची सेवा ग्राहकांना मिळते. शेती परवडत नाही असे म्हणणार्‍या तरूणांनी या व्यवसायात उतरावे.  - शहाजी साळुंखे, जानकी अ‍ॅग्रो टूरिझम