Fri, Jan 18, 2019 19:08होमपेज › Satara › सावकारीप्रकरणी ६ जणांवर गुन्हा

सावकारीप्रकरणी ६ जणांवर गुन्हा

Published On: Jan 04 2018 1:04AM | Last Updated: Jan 03 2018 10:49PM

बुकमार्क करा
सातारा : प्रतिनिधी

सातार्‍यात सावकारीचे पेव अद्याप कायम असून, त्याप्रकरणी सहा जणांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 90 हजार रुपयांच्या मोबदल्यात 1 लाख 90 हजार रुपये घेऊन यादोगोपाळ पेठेतील घर जबरदस्तीने घेतले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिस मुलाचेही संशयितामध्ये नाव आल्याने खळबळ उडाली आहे.

प्रदीप दत्तात्रय जाधव, संदीप दत्तात्रय जाधव (दोघे रा. रूद्राक्ष अपार्टमेंट, तामजाईनगर), रोहित सुधीर मोहिते (रा.पोलिस लाईन, राधिका रोड), समाधान ओव्हाळ व अनोळखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील रोहित मोहिते हा पोलिसाचा मुलगा आहे. या प्रकरणी रोहन राजेंद्र चव्हाण (वय 30, रा. यादोगोपाळ पेठ) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.    

तक्रारदार रोहन व पोलिस बॉय रोहित हे मित्र आहेत. जून 2012 मध्ये तक्रारदार रोहन यांना पैशाची गरज असल्याने संशयित रोहित याने त्यांची प्रदीप जाधव याच्याशी ओळख करुन देवून सावकारीने पैसे देण्यास सांगितले. तक्रारदार रोहन यांनी वेळोवेळी तीन टप्प्यात एकूण 90 हजार रुपये 20 टक्के व्याजाने घेतले. व्याजाने पैसे घेतल्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी एकूण 1 लाख 90 रुपये दिले. मात्र व्याजाची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून संशयित सर्वांनी तक्रारदार यांना शारिरिक, मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

व्याजाने पैसे घेतेवेळी संशयितांनी तक्रारदार यांच्याकडून कोर्‍या स्टॅम्पवर सह्या घेतल्या होत्या. तक्रारदार यांना मारहाण करुन त्यांच्याकडील यादोगोपाळ पेठेतील घर जबरदस्तीने नावावर करुन घेतले. घराचा ताबा मागितल्यानंतर संशयितांनी तो देण्यास नकार दिला व जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिस ठाण्यात तक्रार देवू नये यासाठी वेळोवेळी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, यातील दोघांना यापूर्वीच अटक झाली असून पोलिस उर्वरीत संशयितांचा शोध घेत आहेत.