Thu, Jun 27, 2019 18:09



होमपेज › Satara › मानधन घटल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ

मानधन घटल्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेकडे विद्यार्थ्यांची पाठ

Published On: Mar 26 2018 1:33AM | Last Updated: Mar 25 2018 10:53PM



औंध : वार्ताहर

शासनाने ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवतावाढीसाठी सुरू केलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  अवघी शंभर रुपये शिष्यवृत्ती दिली जात असल्याने गेल्या पाच वर्षात 50 टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. शासनाच्या योजना झाल्या उदंड पण विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागल्या टिचभर, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शासनाने इयत्ता चौथीसाठी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा सुरू केली होती. समाजामध्ये या परीक्षेला मोठा  मानसन्मान आहे. त्यामुळे पालकवर्ग जागृतपणे  मोठ्या प्रमाणात आपले पाल्य या परीक्षेस बसवित आले आहेत. अलिकडच्या काळात या परीक्षेमध्ये मोठे बदल करण्यात आले. मागील वर्षापासून ही शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व आठवी इयत्तांसाठी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून घेतल्या जाणार्‍या या परीक्षेसाठी मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी या विषयांसाठी प्रत्येकी 150 गुणांची परीक्षा घेतली जात आहे.या परीक्षेसाठी विद्यार्थी तसेच शालेयस्तरावर मोठ्या प्रमाणात शिक्षक परिश्रम घेत आहेत. वर्षभर विविध प्रकाशनांच्या प्रश्‍नपत्रिका संच तसेच शालेय स्तरावर मोठ्या प्रमाणात सरावही घेतला जातो. मागील वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून  सुमारे 15 लाख विद्यार्थी बसले होते परंतु यावर्षी हा आकडा 8 लाखच्याही आत आल्याने सध्या हा विषय शिक्षणक्षेत्रात चिंतेचा व चर्चेचा बनला आहे. 

त्यातच शासन कष्ट घेणार्‍या व गुणवत्तेमध्ये येणार्‍या विद्यार्थ्यांना तुटपुंजी शिष्यवृत्ती देणार असेल तर त्याचा काय  उपयोग? शालेय स्तरावर अन्य प्रकारच्या विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात  त्यासाठी कोणतेही  म्हणावे तसे निकष नाहीत. मात्र, याठिकाणी विद्यार्थ्यांनी घाम गाळूनही  काही उपयोग होत नाही, अशी भावना झाल्याने गुणवंत विद्यार्थ्यांनी या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे. मागील पाच वर्षात ही संख्या पन्नास टक्यांनी घटली आहे.

राज्यातील शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये  पाचवीच्या सोळा हजार तर आठवीच्या तेरा हजार विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते पण शिष्यवृत्ती कमी अन खर्च जास्त, अशी अवस्था विद्यार्थी, पालकांची झाली आहे

संख्या घटल्याने चिंता

सन 2013-14 साली इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सुमारे 8 लाख 90 हजार विद्यार्थी या परीक्षेस बसले होते तर सातवीच्या परीक्षेस 6 लाख 79 हजार विद्यार्थी बसले होते. यावर्षी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेस 4 लाख 43 हजार विद्यार्थी बसले आहेत तर  आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस 3 लाख 36 हजार विद्यार्थी बसले आहेत. वरील आकडेवरून परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट दिसून येत आहे. परीक्षेसाठी विद्यार्थीसंख्या घटल्याने शिक्षण क्षेत्रातून चिंता व्यक्त केली जात आहे.