Wed, Aug 21, 2019 15:28होमपेज › Satara › पळशी सोसायटीत ५८ लाखांचा अपहार 

पळशी सोसायटीत ५८ लाखांचा अपहार 

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:24PM

बुकमार्क करा

कोरेगाव / पळशी : प्रतिनिधी

पळशी, ता. कोरेगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीमध्ये सचिव दशरथ संपत भोसले याच्यासह चेअरमन बाळकृष्ण भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम गायकवाड, जिल्हा बँकेचे तत्कालीन विकास अधिकारी संतोष भोईटे व सोसायटीच्या संचालक मंडळाने दि. 1 एप्रिल 2014 ते दि. 31 मार्च 2016 या कालावधीत 58 लाख 25 हजार 698 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहकार खात्यांतर्गत अप्पर लेखापरीक्षक (सहकारी संस्था) नरेंद्र संतोष ऊर्फ एन. एस. पवार यांनी 19 जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, दि. 1 एप्रिल 2014 ते दि. 31 मार्च 2016 या कालावधीत पळशी विकास सोसायटीचे लेखापरीक्षण केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अफरातफर आढळून आली होती. या अपहार रकमेच्या अनुषंगाने म्हणणे सादर करण्यासाठी सोसायटीचे सचिव, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सातारारोड शाखेचे विकास अधिकारी यांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.

सदर नोटीसांबाबत वरील नमूद व्यक्‍तींनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांनी सोसायटीमध्ये आपापसात संगनमत करुन हातावरील नियमबाह्य रोख शिल्लक, सभासद बँक खाती भरणा रकमेचा रोजकीर्दीला नावे टाकून प्रत्यक्ष जमा पावती न काढता हातावरील रोख शिल्लक कमी करणे व बेनामी रकमा खर्ची टाकणे अशा प्रकारे 58 लाख 25 हजार 698 रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

याबाबत वरिष्ठ कार्यालयास सादर केलेल्या अफरातफर विशेष अहवालावरुन वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार फिर्याद देत असून, त्यामध्ये सचिव दशरथ संपत भोसले, चेअरमन बाळकृष्ण तुकाराम भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम शिवराम गायकवाड, संचालक दत्तात्रय व्यंकट भोसले, नाझीम हमदुल्ला इनामदार, शंकर शामराव गायकवाड, सुभाष जगन्नाथ सपकाळ, मारुती विठोबा गायकवाड, प्रवीण लक्ष्मण दिसले, धनंजय सुर्याजी पिसाळ, शांताबाई हणमंत गायकवाड,

सलीम इसाक इनामदार, संतोष बाबुराव भगत, दादा अब्दुल मुलाणी, भारत कोंडीराम भोईटे, शैला जालिंदर पिसाळ, शरद किसन दिसले, तात्याबा आबाजी भंडलकर यांच्यासह सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सातारारोड शाखेचे तत्कालीन विकास अधिकारी सुनील रावसाहेब भोईटे यांनी  दि. 1 एप्रिल 2014 ते दि. 31 मार्च 2016 या कालावधीत 58 लाख 25 हजार 698 रुपयांचा अपहार केला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. त्यानुसार कोरेगाव पोलीस ठाण्यात 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी म्हेत्रे तपास करत आहेत.