Thu, Jun 27, 2019 16:18होमपेज › Satara › जिल्ह्यात 50 लाख लिटर दुधाचे संकलन घटले

जिल्ह्यात 50 लाख लिटर दुधाचे संकलन घटले

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 10:54PMसातारा: महेंद्र खंदारे

कर्नाटक व केरळ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही दूधाला 5 रूपये अनुदान द्यावे, यासाठी स्वाभिमानीने सुरू केलेल्या दूध बंद आंदोलनाचा बुधवारी तिसरा दिवस होता. जस जसे आंदोलन पुढे जात आहे तस तसा दूधाचा तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्ह्यात दररोज 20 ते 25 लाख लिटर दूधाचे संकलन होते. मात्र, आंदोलन सुरू झाल्यापासून तीन दिवसांच्या कालावधीत अवघे 10 लाख 41 हजार 300 लिटर दूधाचे संकलन झाले आहे. तर 70 टक्के दूध संकलन केंद्रात पोहचलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यात आंदोलनाची धार वाढली असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाला शेतकरी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दिवसेंदिवस दूधाचे संकलन कमी होत चालले आहे. त्यामुळे दूध प्रक्रिया करणारे उद्योग ठप्प झाले आहेत. 

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दूग्ध व्यवसाय करतात. हे दूध ते संकलन केंद्रात जमा करतात. सध्या दूधाला 17 रूपये प्रति लिटर असा दर मिळतो. मात्र, यामधून उत्पादन खर्चही भागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. सातारा जिल्ह्यात अनेक भागातील संकलन केंद्रे ठप्प झाली आहेत. तर स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर दूध ओतणे, टँकरमधून दूध सोडणे, टँकरची तोडफोड करून निषेध व्यक्‍त करत आहे. जिल्ह्यात आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

जिल्ह्यामध्ये शासनाचा एक दूध संघ, 6 सहकारी दूध संघ,  5 मल्टीस्टेट दूध संघ, 57 खासगी दूध प्रकल्प आणि 352 सहकारी दूध संस्था आहेत. या सर्व संस्थांमधून दिवसाला 20 ते 25 लाख लिटर दूध जमा होते. रविवारी मध्यरात्री दूध बंद आंदोलनाला सुरूवात झाली. त्या दिवशी 25 लाख 82 हजार 800 लिटर दूधाचे संकलन झाले होते. मात्र, आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर दुध संकलनामध्ये झपाट्याने घट आली आहे. सोमवारी शासनाच्या व सहकारी दूध संघामध्ये 4 हजार 600 लिटर, मल्टी स्टेट दूध संघामध्ये 30 हजार 400 लिटर, खासगी दुध प्रकल्पांमध्ये 50 हजार 500 लिटर असा एकूण 93 हजार 900 लिटर दूध संकलन झाले. मंगळवारी शासनाच्या दुध संघात 4 हजार 900 लिटर, सहकारी दूध संघांमध्ये 44 हजार 400 लिटर, मल्टी स्टेट दूध संघात 22 हजार 100 लिटर तर खासगी दूध प्रकल्पांमध्ये 4 लाख 33 हजार 200 लिटर असे एकूण 5 लाख 6 हजार 200 लिटर दूध संकलन झाले.  तर बुधवारी शासनाच्या दूध संघामध्ये 3 हजार 00 लिटर, सहकारी दूध संघांमध्ये 33 हजार 100 लिटर, मल्टी स्टेट दूध संघात 20 हजार 400 लिटर, तर खासगी दूध प्रकल्पांमध्ये 3 लाख 34 हजार 400 लिटर असे एकूण 4 लाख 41 हजार 400 लिटर दूध संकलन झाले आहे. दररोज सरासरी 25 लाख लिटर दूधाचे संकलन होते. त्यानुसार 75 लाख लिटर दूध संकलन झाले असते. मात्र, आंदोलनामुळे या तीन दिवसात अवघे 10 लाख 41 हजार 300 लिटर दूध संकलन झाले. 

ग्रामीण भागामध्ये या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील बहुतांश दूध डेअर्‍या व संकलन केंद्रांना टाळे ठोकलेले चित्र आहे. जिल्ह्यात तब्ब 70 टक्के संकलन केंद्रात दूध जमा होत नाही. तर 30 टक्के संकलन केंद्रात थोडे थोडे दूध जमा होत आहे. हे आंदोलन आणखी किती दिवस सुरू राहणार याची कल्पना नाही. त्यामुळे काही दिवसांमध्ये सर्वच संकलन केंद्रे बंद राहणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे. महानगरांचा दूध पुरवठा तोडण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, याचा फटका जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांनाही आता बसू लागला आहे. घरगुत रतीबाने दूध घालणारा शेतकरी येतच नसल्याने दूधाविनाच दिवस ढकलावे लागत आहेत.