Sun, Nov 18, 2018 11:18होमपेज › Satara › 'ओटीपी'द्वारे ५० हजारांची फसवणूक; पोलिसांमुळे २५ हजार मिळाले

'ओटीपी'द्वारे ५० हजारांची फसवणूक; पोलिसांमुळे २५ हजार मिळाले

Published On: May 28 2018 2:29PM | Last Updated: May 28 2018 2:29PMसातारा : प्रतिनिधी

बँकेचा मॅनेजर बोलतोय असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागवून खात्यातील 50 हजार रुपये चोरल्याची घटना घडली. सातारा सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने तत्काळ गतीमान तपास करुन तक्रारदाराचे 25 हजार रुपये मिळवून दिले. दरम्यान, तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केल्याने त्यांची फसवणूक झाली असून ‘ओटीपी’ क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

विलास भानुदास काटकर (रा.काटकरवाडी, पुसेगाव ता.खटाव) यांनी याबाबतची तक्रार दिली होती. काटकर यांना अज्ञाताने फोन करुन ‘बँकेतील मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले.’ तसे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक देण्यास सांगितल्यानंतर काटकर यांनी तो दिला. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तक्रारदार काटकर यांच्या बँकेच्या खात्यातील ४४ हजार ९९८ रुपये फसवणूक करुन चोरले.

बँकेच्या खात्यावरील पैसे गेल्याचा मेसेज तक्रारदार काटकर यांना आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी सातारा सायबर सेल पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तपास करुन तक्रारदार काटकर यांचे 24 हजार 999 रुपये मिळवून दिले. सपोनि गजानन कदम, पोलिस हवालदार विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव यांनी याचा तपास केला.