Sat, Jul 20, 2019 22:06होमपेज › Satara › भीषण अपघातात कुटुंबासह ५ ठार

भीषण अपघातात कुटुंबासह ५ ठार

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 10:38PMफलटण : प्रतिनिधी

महाड-पंढरपूर राज्य मार्गावर बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेली भरधाव असेंट कार (एम. एच. 14 बीसी 9480) झाडावर आदळून शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात कार चालकासह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. पाचजणांमधील चौघे एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा व मुलगी होते. त्यामुळे या दुर्दैवी अपघाताने एका कुटुंबाचा अंत झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

यामध्ये तुकाराम छगन नामदास (वय 35), सौ. नंदा तुकाराम नामदास (27), सानिका तुकाराम नामदास (13), सिद्धेश तुकाराम नामदास (10, सर्वजण सध्या रा. देहूरोड, पुणे, मूळ गाव कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि हिना यासिम शेख (9, रा. देहूरोड, पुणे) हे पाचजण जागीच ठार झाले.

याबाबत मिळालेली माहिती अशी,  तुकाराम नामदास हे पुणे येथे बापदेवनगर, देहूरोड राहण्यास होते. त्यांच्या शेजारील शेख कुटुंबातील चौघांसह तुकाराम नामदास साठेफाटा (ता. फलटण) येथील विवाह समारंभासाठी आणि त्यानंतर नामदास यांच्या मूळ गावी कारुंडे (ता. माळशिरस) येथे गेले होते. दोन दिवस कारुंडे येथे राहून पुण्याकडे परतत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.

बरड गावच्या हद्दीत आल्यानंतर गाडी वेगात असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाडाला धडकली व प्रचंड आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली. गाडीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्‍काचूर झाला. गाडीचे इंजिन चालकाच्या सीटपर्यंत मागे सरकले. तर गाडीच बॉनेट व काचेचा पूर्ण चक्काचूर झाला. यामध्ये पाच जण या जागीच ठार झाले. तर  जरिना यासिम शेख, आयान यासिम शेख, साब्रिन यासिन शेख, नर्गिस हे चार जण जखमी असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघातानंतर रस्त्याने जाणारे वाहन चालक व परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताची माहिती बरड पोलीस दूरक्षेत्रात दिल्यानंतर बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक भगवान बुरसे व त्यांच्या सहकार्‍यांनी  तातडीने रुग्णवाहिका बोलावून अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पाठविले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनातील वाहन चालक तुकाराम नामदास, पत्नी सौ. नंदा नामदास, मुलगी सानिका व मुलगा सिध्देश या एकाच कुटुंबातील चौघांसह जरिना शेख अशा एकूण 5 जणांचे मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

दरम्यान, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक पवन बनसोड व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व घटनास्थळाची माहिती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय पाटील, नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे, गाव कामगार तलाठी योगेश धेंडे,  अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोकराव शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूस केली. या अपघाताची माहिती मृत व जखमींच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर नातेवाईक दाखल झाले. या अपघाताची रात्री उशिरा नोंद करण्यात आली.

क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे मृतांची संख्या वाढली

साधारणत: मोठ्या व छोट्या चार चाकी वाहनांमध्ये 5 ते 10 प्रवाशांची क्षमता असते. बरड येथे जो अपघात झाला त्या अपघातातील कारची क्षमता ही 4 किंवा 5 प्रवाशांची होती. मात्र, या गाडीमध्ये 9 प्रवासी प्रवास करत असल्याचे अपघातानंतर स्पष्ट झाले. महाड-पुणे हा राज्यमार्ग असून या मार्गावर ही गाडी 100 हून अधिक स्पीडने मार्गक्रमण करत होती. वेग आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यानेच या अपघातात तब्बल 5 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तर चार जखमींमधील 2 जण अत्यवस्थ आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या गाडीत बसल्यानेच मृतांची संख्या वाढली आहे.