Thu, Feb 21, 2019 07:04होमपेज › Satara › अटलजींच्या 47 वर्षांपूर्वीच्या कराडातील कार्यक्रमाला उजाळा

अटलजींच्या 47 वर्षांपूर्वीच्या कराडातील कार्यक्रमाला उजाळा

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 11:59PMकराड : सतीश मोरे

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तत्कालीन भारतीय जनसंघाच्या बळकटीसाठी लाखो रुपयांचा निधी जमा करणार्‍या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी सुमारे 47 वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी कराडमध्ये आले होते. येथील टिळक हायस्कूलच्या मैदानावर त्यांची जाहीर सभाही झाली होती. 

अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सायंकाळी निधन झाले. त्यानंतर कराडमधील 1971 साली त्यांच्या झालेल्या सभेला हरिष जोशी, संजय गोळे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना उजाळा दिला. भारतीय जनसंघाच्या प्रारंभीच्या काळात प्रतिकूल राजकीय परिस्थितीत संघटनेला निधीची आवश्यकता होती. त्यावेळी मधुअण्णा कुलकर्णी, जनसंघाचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जोशी, माजी नगरसेवक राजाभाऊ देशपांडे, डॉ. वाघ, निवृत्ती कवडे, श्रीनिवास लद्दड, गजाभाऊ कोल्हटकर, बिपीन पेंढारकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह जनसंघासाठी निधी गोळा केला होता. हा निधी जनसंघाला सुपूर्त केला जाणार होता आणि त्यासाठीच अटलबिहारी वाजपेयी यांना कराडमध्ये निमंत्रित करण्यात आले होते. 

टिळक हायस्कूलच्या मैदानावर सभा झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी डॉ. वाघ यांच्या निवासस्थानी मुक्काम केला होता. याशिवाय सकाळी त्यावेळी दत्त चौकात वास्तव्यास असलेल्या हरिष जोशी यांच्या घरी ते चहा, नाष्टा घेण्यासाठी गेले होते. कराडकरांनी जनसंघाच्या बळकटीसाठी दिलेला निधीमुळे समाधानाची भावना व्यक्त करत अटलबिहारी वाजपेयी यांनी कराडकरांचे आभारही मानले होते.