Wed, Mar 27, 2019 06:33होमपेज › Satara › जिल्ह्यात 44 अंगणवाडी इमारतींना मंजुरी

जिल्ह्यात 44 अंगणवाडी इमारतींना मंजुरी

Published On: Mar 06 2018 1:55AM | Last Updated: Mar 06 2018 12:11AMरेठरे बुद्रूक : दिलीप धर्मे 

शासनाने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतंर्गत अंगणवाडीच्या नवीन इमारतींच्या बांधकामांना मंजुरी दिली आहे. यात जिल्ह्यातील 44 अंगणवाड्यांचा समावेश असून या अंगणवाड्यांना आता नवीन इमारती मिळणार आहेत. याशिवाय इमारतींसाठी दिले जाणारे भाडे वाचणार असून शैक्षणिक दर्जा उंचावण्यासही मदतच होणार आहे.

शासनाने आदिवासी भागातील गोरगरिब मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, या उदात्त हेतूने राज्यातील वाडा (जि. ठाणे) याठिकाणी पहिली अंगणवाडी शाळा सुरू केली. आज राज्यातील कानाकोपर्‍यात 1 लाख 7 हजार अंगणवाडी शाळा असून त्यात सुमारे 65 लाख मुले शिक्षण घेत आहेत.तसेच 1 लाख 10 हजार सेविकांसह मदतनीस कार्यरत आहेत. आज बहुतांश ठिकाणी अंगणवाडीच्या शाळा भाड्याच्या इमारतीमध्ये असल्याचे दिसत आहे. तर काही अंगणवाडी इमारतीची अवस्था बिकट झाली असून याठिकणी मुलांना शिक्षण देणे धोकादायक बनले आहे.  त्यामुळेच अंगणवाडी शाळांना  स्वमालकीच्या इमारतींची गरज आहे. सातारा जिल्ह्यातील 100 हून अधिक अंगणवाडी शाळांच्या इमारती बांधणे गरजेचे होते. त्याबाबतची मागणीही शासनाकडे करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यातील 66 शाळांना बांधकाम निधी मंजूर झाला होता. 
त्यामुळेच उर्वरित 44 अंगणवाडी इमारतींबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच या अंगणवाडींच्या नवीन इमारतींसाठी निधी केव्हा मिळणार? याबाबतची प्रतिक्षा लागून राहिली होती. मात्र आता 44 अंगणवाडीच्या इमारत बांधकामास शासनाने मंजुरी दिल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शासनाकडून याबाबतचे आदेशही संबंधित विभागास देण्यात आले आहेत. यामध्ये  जिल्ह्यातील कोरेगाव 6, सातारा 6, खंडाळा 3, महाबळेश्‍वर 1, वाई 3, फलटण 5, खटाव 4, माण 4, कराड 5 व पाटण 7 अशा 44 अंगणवाडी शाळांचा समावेश आहे.