Wed, Apr 24, 2019 08:26होमपेज › Satara › 40 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

40 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:30PMसातारा: महेंद्र खंदारे

राज्य शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या कालावधीत राज्य शासनाकडून 9 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये 2 लाख 40 हजार 747 लोकांनी कर्जमाफीसाठी अर्ज केला होता. त्यातील 1 लाख 96 हजार 233 लोकांना याचा लाभ झाला आहे. तर अनेक जण निकषांत न बसल्याने अपात्र झाले आहेत. असे असले तरीही एक वर्ष व 9 याद्या लागल्यानंतरही जिल्ह्यातील सुमारे 40 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी वेटिंगवर आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 442 कोटी 55 लाख रुपये मिळाले आहेत. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या माध्यमातून सोसायटीच्या 1 लाख 79 हजार 577 शेतकर्‍यांना याचा लाभ झाला आहे. तर इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधून 16 हजार 646 लोकांनी लाभ घेतला आहे. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी व्हाव्यात या हेतूने 22 जून 2017 रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांनी छ. शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर केली होती. यामध्ये सरसकट कर्जदार शेतकर्‍याचे दीड लाख रुपये माफ करण्यात आले. याचबरोबर ज्या शेतकर्‍यांनी वेळेवर कर्जे भरली त्यांना प्रोत्साहनपर म्हणून 25 हजार रुपये देण्यात आले. 

ही योजना जाहीर झाल्यानंतर सप्टेंबर अखेर अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्या मुदतीत 2 लाख 40 हजार 447 अर्ज भरण्यात आले होते. त्यानंतर मुदत वाढवण्यात आली. मात्र, यावेळी जास्त अर्ज भरण्यात आले नाही. ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर अर्जांची छाननी करण्यात आली. त्यातून पात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्‍कम येऊ लागली. जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज घेणार्‍या शेतकर्‍यांना 373 कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. तर राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांकडील 16 हजार 646 शेतकरी कर्जदारांना 69 कोटी 23 लाख लाभापोटी मिळालेले आहेत. सद्य स्थितीत 1 लाख 96 हजार 233 लोकांना लाभ मिळाला आहे. मात्र यानंतरही सुमारे 40 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. 

त्यामुळे या वंचितांची दहाव्या यादीकडे लागून राहिले आहे. माहितीच्या पडताळणीसाठी मिसमॅच यादी आली आहे. या यादीची पडताळणी झाल्यानंतर कर्जमाफीची दहावी यादी प्रसिध्द होईल. जिल्ह्यात अनेक कर्जदार शेतकर्‍यांचा कर्जमाफी डाटा राज्यस्तरावर जुळलेला नाही. त्यामुळे संबधित शेतकर्‍यांचा मिसमॅच डाटा पडताळणीसाठी पाठवला आहे. पडताळणीनंतर ही माहिती शासनाला सादर होईल व त्यानंतर लाभार्थींची दहावी यादी प्राप्‍त होईल. 

जिल्ह्यातील बहुतांश कर्जदार शेतकर्‍यांना याचा लाभ मिळालेला आहे. तर ज्या शेतकर्‍यांना याचा लाभ मिळाला नाही यासाठी जिल्हा बँकेकडून अर्ज पडताळणी सुरू आहे. त्यामुळे आणखी काही दिवस ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्यामुळे वंचित असणार्‍या 40 हजार शेतकर्‍यांना लाभ कधी मिळणार हा एक प्रश्‍नच आहे.

दरम्यान, कर्जमाफी व ओटीएस पात्र शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर दि. 1 ऑगस्ट 2017 ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषानुसार पात्र थकीत रकमेवर जिल्हा बँका व विविध सहकारी सेवा संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे व्याजाचा बोजा बँक सोसायटींच्या माथी बसला आहे. शासनाने ही रक्‍कम अनुदान रूपाने द्यावी, अशी मागणी होत आहे.