Mon, Aug 26, 2019 01:30होमपेज › Satara › ४.५ कोटींसाठी पोलिसाचे अपहरण; चौघे ताब्‍यात(Video)

४.५ कोटींसाठी पोलिसाचे अपहरण; ४ ताब्‍यात

Published On: Jun 20 2018 3:08PM | Last Updated: Jun 20 2018 7:31PMकराड : प्रतिनिधी

कराड (जि. सातारा) येथून सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बसवराज चौकीमठ आणि ठाण्यातील किंग फायनान्स कंपनीचा एजंट दिलीप म्हात्रे यांचे अपहरण करून कराडमधून साडेचार कोटींची रक्कम लंपास करणाऱ्या ठाणे, मुंबई परिसरातील चौघा संशयितांना रत्नागिरी पोलिसांकडून कराड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. दिलीप म्हात्रे यानेच संगनमताने मित्रांच्या मदतीने रक्कम लंपास करण्याचा डाव आखला होता. मात्र, रत्नागिरी आणि सातारा पोलिस दलाच्या समन्वयामुळे हा बेत फसला.

पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, कराडचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, रत्नागिरीचे पोलिस उपअधीक्षक गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सर्जेराव गायकवाड, पद्माकर घनवट यांची कराडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेवून याबात माहिती दिली. 

याप्रकरणी गजानन महादेव तदडीकर (वय 45, रा. रमेशवाडी, मानवपार्क बदलापूर पश्चिम कल्याण), विकासकुमार संगमलाल मिश्रा (वय 30, रा. लल्लुसिंगचाळ, जेबीएलआर, दुर्गानगर, जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), महेश कृष्णा भंडारकर (वय 53, विजय गॅलेक्सी टॉवर, प्लॉट नंबर 2405, वाघबीळ, घोडबंदर, ठाणे पश्चिम) आणि दिलीप नामदेव म्हात्रे (वय 49, रा. रॉयल अर्पाटमेंट, रूम नंबर 203, जुना बेलापूर रोड कळवा, वेस्ट ठाणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तदडीकर हा ठाणे पोलिस दलात 1995 पर्यंत कार्यरत होता. पुढे त्याला बडतर्फ करण्यात आले असून, तो संशयित दिलीप म्हात्रे याचा मित्र आहे. दिलीप म्हात्रे हा सुभाष पाटील (रा. वारणानगर, जि. कोल्हापूर) यांच्या परिचयाचा होता. पाटील यांना इंडी (कर्नाटक) येथील ज्ञानयोगी श्री शिवकुमार स्वामीजी शुगर विकत घ्यायचा होता. त्यासाठी सुमारे 225 कोटींचे कर्ज पाटील यांना हवे होते. दिलीप म्हात्रे याने हे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत साडेचार कोटी कमिशन देण्याची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठीच साडेचार कोटी घेऊन सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बसवराज चौकीमठ ते आपल्या सहकाऱ्यांसह कराडला आले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.

या सर्व माहितीची सत्यता पडताळली जात असून, याप्रकणात अजूनही चार संशयितांचा समावेश असून रत्नागिरी आणि सातारा पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.