Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Satara › ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड

ठेकेदार साशा कंपनीला 4 लाखांचा दंड

Published On: Jul 04 2018 2:20AM | Last Updated: Jul 03 2018 11:21PMसातारा : प्रतिनिधी

शहराच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या ठेकेदार साशा हाऊस कीपिंग अँड फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. ठाणे या कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड करत सातारा नगरपालिकेने दणका दिला आहे. घंटागाडीची अनियमितता तसेच घंटागाडीसोबत कर्मचारी उपलब्ध करून न देणे या कारणास्तव साशा कंपनीवर कारवाई करण्यात आली असली, तरी प्रभागातील कचराकुंड्या वेळेवर न उचलणे, प्रभागात आवश्यक ठिकाणी घंटागाडी नेण्यात दिरंगाई करणे या कारणांस्तवही दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

साशा कंपनीला घंटागाड्यांचा ठेका दिल्यावर घंटागाड्यांच्या कामात अनियमतता वाढली आहे. घंटागाडी येत नसल्यामुळे घरातील   कचरा सरळ कचराकुंडीत येत आहे. त्यातच शहरातील कचर्‍याने भरलेल्या कचराकुंड्या वेळेवर उचलून नेल्या जात नाहीत. त्यामुळे त्या परिसरातील कचरा सडल्याने मोठी दुर्गंधी पसरत आहे. अनेक ठिकाणाहून लोकांची मागणी होत असतानाही ठेकेदार साशा कंपनीकडून त्याठिकाणी घंटागाडी सुरु करण्यास प्रचंड विलंब लावला जात आहे. घंटागाडीची सुविधा चोवीस तास दिली जाणार होती तर नागरिकांनी मागणी केल्यावर त्याप्रमाणे उपलब्धता का होत नाही? साशा कंपनीने सातारा पालिकेशी ज्याप्रमाणे करार केला त्यानुसार कामकाज व्हायला हवे. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळेच शहरातील मुख्य चौकातील कचराकुंड्या भरुन वाहत आहेत. कचरा संकलन व्यवस्थित न करणे तसेच घंटागाडीवर साशाकडून कर्मचारी उपलब्ध करु न देणे यावरुन  सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाने साशा कंपनीला 3 लाख 76 हजार 584 रुपयांचा दंड केला आहे. 

साशा कंपनीने डिसेंबर 2017 पासून शहरात स्वच्छतेचे काम सुरु केले. साशाला प्रभाग क्र. 1 ते प्रभाग क्र. 10 तसेच प्रभाग क्र. 11 ते प्रभाग क्र. 20  असे मिळकतींच्या संख्येनुसार टेंडर देण्यात आले. त्यानंतर या कंपनीकडून कामकाजात बेपर्वाई झाली. त्यामुळे दंडात्मक कारवाई झाली आहे. 

डिसेंबर 2017-जानेवारी2018 कालावधीत 89 हजार 840 रुपयांचा दंड करण्यात आला. त्यानंतर जानेवारी-फेब्रुवारी  महिन्यात 11 हजार 544 रुपये, फेब्रुवारी-मार्च महिन्यात 25 हजार 640 रुपये, मार्च-एप्रिल महिन्यात 30 हजार 600, एप्रिल-मे महिन्यात 1 लाख 19 हजार 200 रुपये  तर, मे-जून महिन्यात 89 हजार 760 रुपये दंड वसूल करण्यात आला. ठेकेदाराला वचक बसावा म्हणून सातारा पालिकेने दंडात्मक कारवाई केली असली तर कामातील त्रुटी पहाता दंडाचा आकडा खूप कमी आहेत. पहिल्या आणि सहाव्या महिन्यातच मोठ्या प्रमाणात दंड झाल्याचे दिसते. दंडात्मक कारवाई करुनही ठेकेदाराला काही फरक पडत नसेल तर साशा कंपनीचा ठेका रद्द करावा, अशी मागणी होत आहे.