Thu, Jul 18, 2019 17:02होमपेज › Satara › खिडकीचा गज वाकवून रिमांडहोममधील 4 मुले पसार

खिडकीचा गज वाकवून रिमांडहोममधील 4 मुले पसार

Published On: Jul 05 2018 1:41AM | Last Updated: Jul 05 2018 12:01AMसातारा : प्रतिनिधी

सातारा रिमांड होममधील चार अल्पवयीन मुले बाथरूमच्या खिडकीचे गज वाकवून पसार झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ओंकार नीलेश काशीद (वय 14, मूळ रा. नेर, ता. खटाव), प्रल्हाद शिवाजी पवार (वय 17, रा. विलासपूर, सातारा), ओंकार कृष्णा देटके (वय 15, रा. गोडोली), जावेद अतिफ काळे (वय 17) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रिमांडहोममधील शिक्षक गणपत तुकाराम उबाळे यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी दुपारी रिमांड होममधील सर्व मुले आपापल्या खोलीत होती. त्यावेळी संबंधित अल्पवयीन मुले बाथरूममध्ये गेली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास  गेलेली ही मुले बराचवेळ झाला तरी आली नाहीत. त्यामुळे रिमांडहोममधील शिक्षकांनी तेथे धाव घेतली.

बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवले असल्याचे लक्षात आले. संबंधित मुले त्या खिडकीतून बेपत्ता झाली असल्याची शंका बळावली. घडलेल्या घटनेबाबतची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. 

रिमांडहोममधील अल्पवयीन चार मुले  एकाचवेळी पसार झाले असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसही हडबडून गेले. बेपत्ता सर्व मुलांचे फोटो व त्यांचे वर्णन अशी माहिती घेवून गस्तीवर असणार्‍या पोलिसांना त्याबाबतची माहिती देण्यात आली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.