Wed, Apr 24, 2019 22:11होमपेज › Satara › महाश्रमदानामध्ये 35 हजार लोकांचा सहभाग

महाश्रमदानामध्ये 35 हजार लोकांचा सहभाग

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 08 2018 12:18AMदहिवडी : प्रतिनिधी

महाराष्ट्रदिनी माण तालुक्यात आयोजित महाश्रमदानामध्ये 35 हजाराहून अधिक लोकांनी श्रमदान केले. यामध्ये मुंबईसह राज्याच्या अनेक भागातून लोक गावाकडे श्रमदान करण्यासाठी आले होते. त्यामुळे लोकांनीच आता दुष्काळ संपवण्याचा निर्धार केला आहे.

माणमधील 66 गावात लोक सहभागातून जलसंधारणाची चळवळ जोरदार सुरू आहे. माणदेशी माणसांना साथ देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून जलमित्र माणमध्ये आले होते. दुष्काळमुक्तीसाठी सुरु असलेल्या माणवासीयांच्या लढ्याला सर्वच क्षेत्रातील दिग्गजांची साथ मिळाली.

सकाळी 6 वाजलेपासून अनेक गावांच्या शिवारात ग्रामस्थांची श्रमदानाची लगबग सुरु होती. तसेच बाहेर गावाहून येणार्‍या पाहुण्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु होती. टिकाव, खोरी, घमेली श्रमदानासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. माणसांबरोबर बैलजोडीही श्रमदानासाठी आणण्यात आली होती. ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी आ. जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, उपसचिव नामदेव भोसले, पोपटराव मलिकनेर, सह आयुक्त आयकर नितीन वाघमोडे, संदीप भोसले, ऑलिम्पियन खेळाडू ललिता बाबर, मुंबई महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे सह आयुक्त मधुकर मगर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, सर्व जि.प व पंचायत समिती सदस्य, ड्रीम सोशल फाऊंडेशन व माणदेश फाऊंडेशचे पदाधिकार्‍यांनी यामध्ये सहभाग घेतला.

अनेक गावात श्रमदानाच्या ठिकाणीच ध्वजारोहण करुन महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. कुक्कुडवाड येथे सर्वात जास्त 8500 लोकांनी श्रमदान केले. तालुक्यातील 35 हजार लोकांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त लोक  बाहेरून माण तालुक्यात आले होते. तालुक्यातील विविध अधिकार्‍यांनीही कुटूंबियांसह श्रमदान केले. बिदाल व अनभुलेवाडीच्या तरुणांनी गावागावात जावून श्रमदान केले तसेच मार्गदर्शनही केले. जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे यांनी दोनशे लोकांसह कळसकरवाडी व गाडेवाडी येथे श्रमदान करुन आपला वाढदिवस साजरा केला.  

माण तालुक्यातील जनता दररोज सकाळी लवकर उठून ठरलेल्या ठिकाणी कामावर हजर राहत आहे.सकाळी श्रमदान केल्यानंतरच लोक स्वतःचा व्यवसाय बघत आहेत. दुष्काळ कायमस्वरूपी हटवायचा हा निश्‍चय करूनच माणदेशी माणूस झपाटल्यासारखे काम करत आहे. यामध्ये लहानांपासून,महिला व आबालवृद्ध असा सारा गावं सहभागी होत आहे. पाणी फाउंडेशनच्या टीमच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने जलसंधारण चळवळ माणदेशात एका निर्णायक टप्प्यावर असून टँकर मुक्ती  व स्वयंपूर्ण खेडी तयार करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

Tags :  satara dahiwadi,  work