Sun, Mar 24, 2019 04:20होमपेज › Satara › तख्ताच्या वाड्यात घुमला शाहूंचा जयजयकार

तख्ताच्या वाड्यात घुमला शाहूंचा जयजयकार

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 10:48PMसातारा : प्रतिनिधी

शककर्ते छ. शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र तसेच सातारा नगरीचे निर्माते छत्रपती शाहू महाराज यांच्या 337 व्या जयंतीदिनी ‘दक्ष’ विचारमंचच्या वतीने आयोजित सोहळ्यात तख्ताच्या वाड्यात छ. शाहूंचा जयजयकार प्रथमच घुमला. राजघराण्यातील दोन्ही लोकप्रतिनिधींसह शाहूप्रेमी सातारकरांनी या सोहळ्याला लावलेली उपस्थिती लक्षणीय होती. 

कार्यक्रमात खा.श्री  छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले या राजघराण्यातील लोकप्रतिनिधींनी पुढील वर्षापासून होणार्‍या ‘शंभूशाहू’ महोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची दिलेली ग्वाही संयोजकांचे बळ वाढविणारी ठरली. 

कार्यक्रमास दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, विनोद कुलकर्णी, नगरसेवक किशोर शिंदे, सागर पावशे, सुजाता राजेमहाडिक, अनिता घोरपडे, लता पवार, अमोल मोहिते, प्रा. संभाजीराव पाटणे, शशिकांत ढवळे, कॉ. प्रकाश भिसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.बाल शिवाजी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी संगममाहुली येथील छत्रपती शाहूंच्या समाधीवरुन आणि नृसिंह मंडळाने अजिंक्यतार्‍यावरुन आणलेल्या शाहू ज्योतीचे नगरसेविका आशा पंडित, अण्णा लेवे, मनोज शेंडे, रामभाऊ हादगे यांनी स्वागत केले. 

इतिहास संशोधक घन:शाम ढाणे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. संभाजीराव पाटणे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शाहू आणि प्रतापसिंह महाराजांच्या कार्याची माहिती दिली. त्याकाळात उभारलेल्या आणि जतन केलेल्या वास्तू उजेडात आणताना त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज या पुस्तिकेमुळे छत्रपती शाहूंच्या जीवनकार्याचा परिचय नव्या पिढीस होणार असून पुढील वर्षापासून सुरु होणार्‍या शंभू शाहू महोत्सवाला सर्व घटकांतून प्रतिसाद मिळाल्यास हा उपक्रम निश्‍चितच जगभरात नावारुपास येईल, असे ते म्हणाले.  कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ओमकार तपासे यांनी लिहिलेल्या ‘स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. 

छत्रपती शाहूंचे दुर्मीळ चित्र उपलब्ध करुन देणारे शशिकांत ढवळे परिवार, प्लास्टिक मुक्‍तीसाठी कृतिशील देगावमधील हेरंब महिला बचतगटाच्या वनिता साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी रवींद्र झूटिंग, महेश पवार, रवी पाटेकर, प्रवीण अहिरे, विवेक जाधव, अजय माळवदे आणि सातारकरांसह  गोवे, परळी आणि निनाम येथील ग्रामस्थ उपस्थित होते. कॉ. किरण माने यांनी प्रास्तविकात छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. शिवप्रेमी अरबाज शेख यांच्या शिवललकारीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.