Sun, Mar 24, 2019 12:52होमपेज › Satara › अबब.. शौचालयासाठी 33 लाखांचा खर्च

अबब.. शौचालयासाठी 33 लाखांचा खर्च

Published On: Aug 14 2018 1:05AM | Last Updated: Aug 14 2018 12:15AMवाई : यशवंत कारंडे

वाई महागणपती घाट परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे. नवीन तयार करण्यात आलेले सुलभ शौचालय बंद असल्याने भाविक व पर्यटक यांची मोठी गैरसोय होत आहे. सुमारे 33 लाख रूपये या शौचालयासाठी खर्च दाखवण्यात आला आहे. एवढा अवाढव्य खर्च करूनही शौचालयाचे काम पूर्ण झालेले नाही. जे काम झाले आहे ते अंत्यत निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्या पावसातच इमारतीला गळती लागली आहे. तर वरील मजल्यावर जाण्यासाठी आराखड्यात जिना  दाखवून खर्च दाखवला आहे. मात्र, प्रत्यक्षात जिनाच नसल्याने या कामात भ्रष्टाचार झाला आहे. पालिकेच्या या कारभारामुळे भाविकांची मात्र कुचंबना होत आहे. 

वाईतील प्रसिध्द अशा महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी होते. मात्र, या ठिकाणी पालिकेच्यावतीने सुलभ शौचालयाची सोय नसल्याने नागरिकांची कुचंबना होत होती. विशेषत: महिलांची यामुळे मोठी गैरसोय होत होती. हीच बाब लक्षात घेऊन महागणपती मंदिरापासून काहीच अंतरावर सुलभ शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. या कामाचे पुण्यातील एका कंपनीला ठेका देण्यात आला होता. मात्र, या कंपनीने वाईतीलच एक सब ठेकेदार नेमून हे काम पूर्ण केले. 10 सीटरचे हे शौचालय बांधण्यासाठी साधारणत: 8 ते 10 लाखांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, हे शौचालय बांधण्यासाठी तब्बल 33 लाख रूपये खर्च झाल्याची माहिती पालिकेतून मिळाली आहे. आठ ते दहा लाखाच्या बांधकामासाठी पालिकेने 33 लाख रुपये खर्च केल्याने शौचालयातही कुणाचेे उखळ पांढरे करण्यात येत आहे. याबाबत चर्चा सुरु आहे. ठेकेदाराकडून शौचालयात बसवण्यात आलेली भांडी योग्य पध्दतीने बसवण्यात आलेली नाही. 

येथे शौचालय सध्या असले तरी ते अनेकदा व सायंकाळी आठ नंतर बंदच असते. अत्यंत लहान शौचालयासाठी प्रचंड खर्च करुनही इमारतीचा स्लॅब व प्लबींग कामगार खोली ही कामे निकृष्ठ करण्यात आल्याने वाईकरांच्या लाखो रूपयांचा अक्षरश: चुना लागला आहे. नवीन शौचालय बंद असल्याने भाविक व पर्यटकांना परिसरात शौचासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक भाविक परिसरात शौचालयाची योग्य सुविधा नसल्याने वाई पालिकेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. शौचालयाच्या बांधकामाचा खर्च व कामाचा दर्जा याची चौकशी व्हावी अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. 

सध्या 8 ते10 हजार रुपये स्क्‍वेअर फुट खर्चाचे हे शौचालय असून नसल्यासारखेच आहे. सध्या या परिसरात मोठया प्रमाणात झुडपे गवत वाढल्याने डेंग्यूचे डासही वाढले आहेत. शौचालय बंद असल्याने पर्यटक तेथे उघड्यावरच शौचास जात आहेत. त्यामुळे या शौचालयाच्या गळतीचे काम व्हावे. तसेच येथे राहण्याची खोली दुरुस्त होऊन जिन्याची सोय करावी जेणेकरुन  कायमस्वरूपी कामगार या ठिकाणी राहू शकेल. वास्तविक काम पूर्ण न होताच या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. त्याचबरोबर याचे उद्घाटनही करण्यात आले आहे.