Tue, Apr 23, 2019 19:38होमपेज › Satara › राष्ट्रवादीच्या शासनाकडे ३१ मागण्या

राष्ट्रवादीच्या शासनाकडे ३१ मागण्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

शनिवारी कराडमध्ये राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनास प्रारंभ करत राष्ट्रवादी काँग्रेसने कराडच्या प्रांताधिकार्‍यांना 31 मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांमध्ये शेतकरी, महागाई, वीज, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्ते, उद्योगांसह रोजगारात झालेली घट, राज्यावरील कर्ज, नागरी भागातील समस्या, कुपोषण यासह विविध समस्यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात गेल्या तीन वर्षात पोकळ आश्‍वासने देऊन जनतेची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमण्यात आलेल्या खाजगी क्षेत्रातील विशेष कार्य अधिकार्‍यांनी राज्याचे प्रशासनच ताब्यात घेतले आहे, असा दावाही निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. तसेच गेल्या तीन वर्षात शेतमालाच्या निर्यातीत 64 हजार कोटींची घट झाली असून आयात मात्र 65 हजार कोटींनी वाढली आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना हमीभाव मिळत नाही. गुजरातप्रमाणे कापसाला हमीभावावर प्रतिक्विटंल 500 रूपये बोनस द्यावा, मध्यप्र्रदेशप्रमाणे हमीभाव व शेतकर्‍यांना मिळालेला बाजारभाव यातील फरक शेतकर्‍यांच्या खात्यावर अनुदान स्वरूपात जमा करावा. कोकणातील आंबा उत्पादक व फलोत्पादक शेतकरी यांचे वातावरणातील बदलांमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी.

शेतकर्‍यांचे कृषी पंपाचे वीज बील तात्काळ माफ करावे, गेल्या तीन वर्षात 2 लाख कृषी पंपाचा अनुशेष निर्माण झाला आहे. ती सर्व कनेक्शन तात्काळ देण्यात यावीत. जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे जनता त्रस्त झाली आहे. गेल्या तिमाहीत महागाईचा दर 5.9 टक्क्यांनी वाढला आहे. कडधान्य, भाजीपाला, खाद्यतेल यांचे दर आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे जीवनाश्यक वस्तूवरील कर कमी करावा. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर अन्य राज्यांच्या तुलनेत 10 रूपयांनी जास्त आहेत. गॅसचे दरही वारंवार वाढत आहेत. त्यामुळेच पेट्रोलियम पदार्थांना तातडीने जीएसटी लागू करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.