होमपेज › Satara › कोयनेत 3 टीएमसी पाण्याची आवक

कोयनेत 3 टीएमसी पाण्याची आवक

Published On: Jul 08 2018 1:46AM | Last Updated: Jul 07 2018 10:57PMपाटण : प्रतिनिधी  

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला आहे. शुक्रवार सायंकाळपासून शनिवार सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा 40.53 टीएमसी इतका झाला असून, चोवीस तासांत कोयनेत 125 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

शनिवारी सकाळपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्‍वर या सर्वच ठिकाणी संततधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून येणार्‍या पाण्याचे प्रमाण काही प्रमाणात वाढले आहे. त्यामुळेच धरणातील पाणीसाठा 37.51 टीएमसीवरून 40.53 टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. धरणातील उपयुक्‍त साठा 35.53 टीएमसी इतका असून धरणाची पाणी उंची 2094.10 फूट, जल पातळी 638.505 मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे एकूण 1 हजार 546 मि. मि., नवजा 1 हजार 421 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 1 हजार 278 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.