Sun, Mar 24, 2019 17:27होमपेज › Satara › रमाई आवाससाठी जिल्ह्याला 3 हजार घरकुले

रमाई आवाससाठी जिल्ह्याला 3 हजार घरकुले

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 10:34PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात रमाई आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) भागातील गोरगरीब नागरिकांसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाने सन 2017 व 18 साठी सुमारे 3 हजार घरकुले मंजूर केली असून त्यासाठी सुमारे 36 कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील गरिबांना घरकुले मिळण्यास मदत होणार आहे.

सन 2017 व 18 साठी रमाई आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) शासनाने यापुर्वी 300 घरकुले मंजूर केली होती. परंतु जिल्ह्यास  सुमारे 3 हजार घरकुलांची आवश्यकता असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  समाज कल्याण आयुक्तालयाला कळवले होते. त्यानुसार सीईओंच्या पत्राची दखल घेत समाजकल्याण, आयुक्‍तांनी सातारा जिल्ह्यासाठी सुमारे 3 हजार घरकुले मंजूर केली आहेत.  

प्रत्येक घरकुलासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. याशिवाय या घरकुलांवर संबंधित लाभार्थ्याने काम केल्यास रोजगार हमी योजनेमधून 90 दिवसाच्या मजुरीपोटी 18 हजार 90 रुपये मिळणार आहेत.तसेच संबंधित लाभार्थ्याने यापुर्वी शौचालयाचे बांधकाम केले नसेल किंवा शौचालयाच्या अनुदानाचा लाभ घेतला नसेल तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे 12 हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या  कुटूंब यादीत नाव नसेल तर रोजगार हमी योजनेमधून अशा पात्र लाभार्थ्यास 12 हजार रुपयापर्यंत निधी उपलब्ध होणार आहे. 

रमाई आवास योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांच्या आत असल्याचा सन 2016 व 17 चा तहसीलदारांचा दाखला, एस सी प्रवर्ग जात दाखला, प्रांताधिकारी दाखला, 15 वर्षे महाराष्ट्र रहिवासी दाखला, ग्रामसभा शिफारस, पी एम ए वाय ड यादीत नाव आवश्यक, जागा असल्याबाबतचा उतारा, प्रधानमंत्री आवास योजनेच्या ब  पात्र यादीत नाव नसावे. कुटुंबातील  कोणत्याही सदस्याचे नावे यापुर्वी घरकुल  लाभ घेतलेला नसावा किंवा  अन्य कोणत्याही शासकीय योजनेतून घरकुल मंजूर नसावे, पक्के घर नसावे आदी  निकष असून संबंधित लाभार्थ्यांनी नजीकच्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नितीन थाडे यांनी केले आहे.