Fri, Jul 19, 2019 07:43होमपेज › Satara › लुटमार प्रकरणी तिघांना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

लुटमार प्रकरणी तिघांना अटक; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Published On: Sep 07 2018 10:56AM | Last Updated: Sep 07 2018 10:56AMऔंध : वार्ताहर

कळंबीनजीक सोन्याच्या दागिन्यांची लुटमार करणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. औंध पोलीसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून  सुमारे अकरा लाखांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या नऊ ते दहा तासात औंध पोलीस, सातारा एलसीबी पथक तसेच विटा पोलिसांनी नाकाबंदी करून तीनही संशयितांना विटा येथे पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी, मलकापूर, कराड येथील सोन्याचे दागिने विकणारे व्यापारी अशोककुमार प्रतापचंद लोहार यांना  एक अज्ञात इसमाचा फोन आला. आम्हाला पुसेसावळी येथे  शोरूम  काढावयाचे  तुम्ही गुरुवारी दागिने घेऊन पुसेसावळी येथे या असे सांगितले. त्यानंतर अशोककुमार लोहार हे पुसेसावळी येथे आले असता त्यांना एकाने  दुचाकीवर बसवून  कळंबी ते औंध रस्त्यावर असणाऱ्या कॅनॉलजवळ आणले. त्याअगोदर त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या दोन जणांनी अशोककुमार लोहार यांच्या डोळयात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील असणारी सोन्याची बॅग हिसकावून पलायन केले. त्यानंतर अशोककुमार यांनी ही माहिती औंध पोलिसांना दिली.  औंधचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांनी ही माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याना दिली. त्यानंतर औंध पोलीसांसह सातारा एलसीबी पथकाने लुटमार करणाऱ्या चोरटयांचा शोध सुरू केला.

पुसेसावळी येथील सीसीटीव्ही फुटेज,मोबाईल लोकेशन तपासून तसेच सातारा जिल्हयासह अन्य ठिकाणी नाकाबंदी करून संशयित आरोपींना अवघ्या दहा तासात विटा येथे जेरबंद केले.  यामध्ये श्रीकांत माळाप्पा केंगार (वय १९), सोमनाथ जालिंदर आवळे (वय २३),सोनल तुकाराम लोटके (वय २२) सर्व रा.विटा जि.सांगली यांना अटक केली. त्यांच्या कडून २ लाख ६९ हजार १२० रुपयांच्या ३४ सोन्याच्या लहान अंगठ्या, २लाख ३८ हजार ३२ रुपयांचे कानातील ४२ टाँप्स, ४ लाख ४६ हजार ८५० रुपयांचे कानातील सोन्याचे खडे असलेले १२१ जोड, १ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे खडे असलेले कुडकी प्रकारचे ५१ जोड असा एकूण ११ लाख २०हजार रूपयांचा ऐवज  जप्त केला आहे. हे सर्व दागिने सुमारे चाळीस तोळे आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान औंध पोलीस ,सातारा एलसीबी पथक ,विटा पोलीस यांनी शिताफीने ही कारवाई केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.